वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील पाझर तलावसह खाजगी जमिनीतून खुलेआमपणे मुरुमचोरी केली जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाळूज महानगर परिसरातील सिडको, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, साजापूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. तसेच धुळे-सोलापूर महामार्गासह स्थानिक प्रशासनाकडून रस्त्याची कामे केली जात आहेत. त्यामुळे मुरुमाची मागणी वाढली आहे.
काही दिवसांपासून परिसरातील पाझर तलावसह खाजगी जमिनीतून मुरुम माफिया खुलेआमपणे मुरुम चोरी करीत आहेत. वडगाव कोल्हाटी, साजापूर पाझर तलावासह भांगसीमाता गड व खवड्या डोंगर परिसरातील खाजगी गट नंबरमधून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन मुरुमाची चोरटी वाहतूक केली जात आहे. .
या विषयी तहसीलदार रमेश मुनलोड म्हणाले की, असे प्रकार आढळून आल्यास सरदील वाहने जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
प्रशासनाची दुहेरी भूमिकाया भागात चोरटी वाळू वाहतूक करणाºया वाळू माफियावर महसूल विभाग व स्थानिक पोलीसांनी कारवाई करुन काही प्रमाणात चोरट्या वाळू वाहतुकीला अंकुश घातला आहे. मात्र, याच भागात सुरु असलेल्या मुरुमचोरीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुरुम चोरी रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.