लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला़ जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या संपामुळे शहरासह ग्रामीण भागातील औषध दुकाने बंद असल्याने रूग्ण व नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले़अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी ३० मे रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता़ देशात सर्रासरपणे बेकायदेशीर रित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री व ई-पोर्टल बाबत शासन व प्रशासनाची सकारात्मक भूमिका याविरोधात हा संप पुकारण्यात आला होता़ या संपामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला़ उस्मानाबाद येथे जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट च्या वतीने आझाद चौकातून जिल्हाधिकारी कार्यलयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चामध्ये शहरासह तालुका व परिसरातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ त्यानंतर जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, सचिव महेश गायकवाड, तालुकाध्यक्ष गणेश कदम, मारूती कृपाळ, शाम जहागिरदार, सागर रणदिवे, अमित घोलकर, हनुमंत माने, कुणाल गांधी, नंदू चांडक, अमित सारडा, लक्ष्मण मुंडे, बबन वीर, विकास भोरे, धनाजी शिंदे, संदीप अंधारे, दिनेश वाबळे, यांच्यासह औषधविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा
By admin | Published: May 31, 2017 12:25 AM