औरंगाबाद : ''माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई - बाबा बाय'' अशी सुसाईड नोट लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने मंगळवारी सातारा परिसरातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सागर महेंद्र कुलकर्णी (रा.ज्योती प्राइड, सातारा परीसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बी.डी. एस शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनपासून शहरात आला होता. त्याचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सागराला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता. त्याच्यावर बराळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी सागराच्या वडिलांनी त्याला चहा देऊन गोळी दिली. त्यानंतर बराच वेळ गप्पा मारल्या.
चाळीस दिवसांवर परीक्षा आल्याने मी परीक्षेची तयारी करतो. तुम्ही काळजी करू नका असे सागरने वडिलांना सांगितले. त्यानंतर सागराचे वडील घाटी रुग्णालयात नोकरीसाठी गेले. आई घरकाम करत होती. ११:३० वाजेच्या दरम्यान सागरने खोलीतील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. बराच वेळ झाला असताना सागर दिसला नाही. परिसरातील नागरिकांनी घरात डोकावून बघितले असता सागरने गळफास घेतला असल्याचे दिसले. यावेळी दरवाजा तोडून सागराला खाली उतरवून त्यांनी सागराला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.