औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ३६५ पदांसाठी १८ संवर्गाच्या भरतीची जाहिरात १ मार्च २०१९ रोजी काढण्यात आली होती. मात्र, आरक्षण, कोरोना आणि विविध निवडणुकांमुळे रखडलेल्या भरतीला अखेर आता मुहूर्त लागला आहे. ५ संवर्गातील पदे १०० टक्के भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता २६५ पदांची जाहिरात २९ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जि.प. आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी शनिवारी दिली.
याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके म्हणाले, सरळ सेवा भरतीला पाच संवर्गातील १०० टक्के भरण्याची मंजुरी मिळाली. दिव्यांगाचे आरक्षण ३ टक्क्यांहून चार टक्के करण्यात आले आहे, तर दिव्यांगात पूर्वी एकच प्रकार होता. आता लर्निंग डिसॅबिलीटी, अंध, अपंग, मूकबधिर, ॲसिड हल्ल्यातील पीडित, सेलेब्रल पाल्सी आदींसह समांतर आरक्षणात बदल होऊन २६५ पदांची २९ जूनला जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर ७ आणि ८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे. यात आरोग्यसेविकांची १८९, आरोग्यसेवक ६६, औषधनिर्माण अधिकारी ८, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ २ अशा पदांचा समावेश आहे. ही भदे भरल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होणार आहे.
---
ग्रामविकास विभागाकडून भरती
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे म्हणाले, आता ही भरती ग्रामविकास विभागामार्फत होणार आहे. एसईबीसीची पदे खुली करण्यात आली असून, त्यांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय उमेदवारांना निवडून लेखी परीक्षा देता येणार आहे.
---
३३ लाखांच्या खर्चाला मान्यता
आरोग्य समितीच्या बैठकीत पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी एक लाख, जटवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संरक्षण भितींच्या बांधकामासाठी आठ लाख रुपये, श्वान, सर्पदंश, धनुर्वात लस खरेदीसाठी पाच लाख, साथरोग साहित्य खरेदीसाठी चार लाख, तर १५ लाखांच्या औषधी खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती गलांडे यांनी दिली.
---
डेंग्यूचा धोका; ग्रामीणमध्ये ७ रुग्ण, १ मृत्यू
आतापर्यंत कन्नड तालुक्यात जैतापूर येथे ५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले तर औरंगाबाद तालुक्यात सरताळासह २ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ महिन्याच्या बालकाचा डेंगीमुळे मृत्यू झाला. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर डेंगीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती करण्याचे निर्देश गलांडे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
---
आरोग्य केंद्रावर १०० टेस्ट करा
जिल्ह्यात १४९ गावांत अद्याप कोरोनाचे संक्रमण पोहोचलेले नाही. त्याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या गावांत पुन्हा संक्रमण होणार नाही. यासाठी खबरदारी तसेच आरटीपीसीआर तपासण्या प्रत्येक आरोग्य केंद्र परिसरात दररोज किमान १०० होणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आठवडी बाजार, छोटे व्यापारी यांच्या मदतीने ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्यांनी प्रबोधन मोहीम राबवण्याच्या सूचनाही आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.