औरंगाबाद: कारमधून ऑईल गळत असल्याची थाप मारून फर्निचर व्यापाऱ्याचे पाच लाख आणि कागदपत्रे असलेली बॅग चोरट्यानी पळवली. आज सकाळी १०:४५ ते १०:५० या दरम्यान मोंढा नाका येथे ही घटना घडली. अवघ्या पाच मिनिटात झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको एन १ मधील रहिवासी मनोहर रतनलाल अग्रवाल हे व्यापारी आहेत. त्यांचा लक्ष्मण चावडी येथे फर्निचर विक्रीचा व्यवसाय आहे. आज सकाळी कारने (एमएच २० ईजे ८१०९ ) ते दुकानाकडे जात होते. जालना रोडवरील जुना मोंढा येथील सिग्नलवर त्यांच्या कारचालकाला एका दुचाकी स्वाराने कारमधून ऑईल गळत असल्याचे सांगितले. मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष केले. सिग्नल सुटल्यानंतर कारने मोंढ्याकडे वळण घेतले. यावेळी परत एक दुचाकीस्वार पाठीमागून आला आणि त्याने अग्रवाल यांना तुमच्या कारमधून ऑईल गळत असल्याचे सांगितले. यामुळे अग्रवाल यांनी चालकाला तातडीने गाडी थांबविण्यास सांगितले. अग्रवाल आणि चालक दोघेही खाली उतरले आणि त्यांनी गाडीची तपासणी सुरु केली. याच दरम्यान मागच्या सीटवरील दोन बॅग पैकी एक बॅग चोरट्यांनी दरवाजा उघडून पळवली. या बॅगमध्ये पाच लाखाची रोकड आणि काही कागदपत्रे होती. अवघ्या पाच मिनिटांमध्ये झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच एसीपी नागनाथ कोडे, गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक शामसुंदर वसुरकर, उत्तम मुळक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास सुरु केला आहे.