कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवायच्या व नंतर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शविताच शनिवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते. आज रविवार असतानाही मोंढ्यातील काही दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत उघडी होती. एरव्ही सकाळी १० वाजेपासून मोंढा उघडत असे. मात्र, किराणा, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने ६ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आता मोंढ्यातील किराणा होलसेल दुकाने सोमवारी सकाळी ७ वाजता उघडतील व दुपारी १ वाजता बंद होतील. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही पहिलीच वेळ असेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार
जाधववाडीतील धान्याचा अडत बाजारही सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी तसे नियोजन करून शेतीमाल त्याच वेळेस घेऊन यावा.
राधाकिसन पठाडे
सभापती, बाजार समिती
चौकट
पोलीस येताच शटर खाली
जिल्हा प्रशासनाने दुकाने दुपारी १ वाजता बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी अनेक किराणा दुकानदारांनी त्यांचे दुकान बंद केले, पण पुंडलिकनगर, गारखेडा परिसर, शिवाजीनगर या भागातील काही किराणा दुकाने, दूधडेअरी सुरूच होत्या. पोलीस येताच व्यापाऱ्यांनी दुकानाचे शटर लगेच खाली केले. हातगाडीवर फळे विक्रेत्यांनाही पोलिसांनी घरी पाठविले.