नळदुर्ग : एका शेतकऱ्याच्या बचत खात्यावरील ८८ हजार रूपये परस्पर उचलून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना २७ डिसेंबर २०१६ ते शनिवारपर्यंत नळदुर्ग येथील स्टेट बँक आॅफ इंडिया (हैद्राबाद) शाखेत घडली़ दरम्यान, शाखाधिकाऱ्यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार समोर आला.नळदुर्ग येथील शेतकरी सोपान आबाजी बागल (वय-६५) यांनी वस्तीतीलच पृथ्वीराज धनराज राठोड (रा़वसंतनगर, नळदुर्ग) याला तुरीच्या पट्टीचा चेक ट्रान्स्फर अर्जावर सही करून भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यासाठी दिला होता़ सोपान बागल यांना केवळ स्वाक्षरी करता येते, याचा फायदा घेऊन पृथ्वीराज राठोड यांनी २७ डिसेंबर २०१६ ते शनिवारपर्यंत सोपान बागल यांच्या खात्यावरील रक्कम एटीएमद्वारे, रोख उचलून व इतराच्या खात्यावर जमा करून फसवणूक केली़ याच काळात अमोल मोतीराम राठोड, गणपत बाबू साठे यांच्या बचत खात्यावरही सोपान बागल यांचे पैसे वळती करण्यात आल्याचे शनिवारी लक्षात आले़ बँकेत पृथ्वीराज राठोड हा शनिवारी पैसे काढत असताना त्याच्या संशयास्पद हलचालीवरून प्रभारी शाखा व्यवस्थापक राजेंद्र आळे यांच्या लक्षात हा प्रकार आला़ त्यांनी पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली़ पोलिसांनी राठोड याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केल्यानंतर बागल यांच्या खात्यावरून रक्कम उचलून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला़ सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तपासाची चक्रे फिरवून उचललेल्या रक्कमेची माहिती घेतली़ या प्रकरणी पृथ्वीराज राठोड याच्याविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
खात्यावरील पैसे परस्पर उचलले
By admin | Published: May 08, 2017 12:19 AM