लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील १९ वर्षांप्रमाणे यंदाही दिवाळीआधी पुन्हा एकदा मोंढा स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यात खुद्द तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुढाकार घेतल्याने प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली होती; पण त्यांची बदली झाली आणि दिवाळीही संपली. पुन्हा मोंढा स्थलांतराचा प्रश्न मागे पडला. स्थलांतराचे घोडे कुठे अडले, हे कळलेच नाही; मात्र आता जाधववाडीतील कृउबा समितीने मोंढ्यातील व्यापाऱ्यांसाठी १२२ प्लॉटचा पहिला टप्पा सोडून दुसऱ्या टप्प्यातील १०० प्लॉट विक्रीचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे. मोंढ्यात येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या कारणामुळे दिवाळीआधी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुद्द मोंढा स्थलांतरासाठी पुढाकार घेऊन बैठकही घेतली होती. यात बाजार समिती संचालक व मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी एकत्र बसून लवकरात लवकर स्थलांतरावर निर्णय घेण्याचेही त्यांनी सुचविले होते; पण अमितेशकुमार यांची बदली झाली आणि मोंढा स्थलांतरावर सर्वांनी चुप्पी साधली. १९९८ मध्ये मोंढ्यातील आडत व्यवहाराचे जाधववाडीतील कृउबाच्या मार्केट यार्डात स्थलांतर झाले, तेव्हा होलसेल व्यवहाराचे स्थलांतर झालेच नाही. तेव्हापासून आजपर्यंत मोंढा स्थलांतराचे भिजत घोंगडे पडले आहे. जाधववाडीत भुसारमालाच्या होलसेल व्यवहारासाठी २२४ प्लॉट मंजूर करण्यात आले आहेत. २००७ मध्ये जुन्या मोंढ्यातील ११९ व्यापारी व इतर अशा एकूण १९१ व्यापाऱ्यांनी प्लॉटपोटी १ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपये बाजार समितीच्या खात्यात जमा केले. बाजार समितीने तेव्हाच्या रेडिरेकनर दराप्रमाणे व्यापाऱ्यांना प्लॉट द्यावेत, अशी मागणी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी केली, तर बाजार समितीने चालू रेडिरेकनर दरानुसार व्यापाऱ्यांना प्लॉट खरेदी करावे लागतील, अशी भूमिका घेतली. यामुळे प्लॉटचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. बाजार समितीने आता मोंढ्यातील २२४ प्लॉटमधील मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांसाठी १२२ प्लॉटचा पहिला टप्पा राखीव ठेवला आहे. उर्वरित १०२ प्लॉट विक्रीला काढण्याचा प्रस्ताव आहे. २ प्लॉटमध्ये सुलभ स्वच्छतागृह उभारण्यात येतील. १४ कॉर्नरचे प्लॉट लिलाव पद्धतीने विकण्यात येतील व ८६ प्लॉट रेडिरेकनर दरापेक्षा जास्त दरात विक्री करण्याचा प्रस्तावात उल्लेख केला आहे. समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, प्लॉट विक्रीतून सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये बाजार समितीला प्राप्त होतील. तसेच वार्षिक भाड्यापोटी ७ लाख ३० हजार रुपये व वार्षिक साफसफाई २,४०० रुपये प्रति प्लॉट याप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये जमा होतील.
मोंढा स्थलांतराचे घोडे पुन्हा अडले; आता नवीन प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:07 AM