औरंगाबाद: दुबईतील एम.आर कॉर्पोरेशनला बिडकीनमध्ये मोठा भूखंड देण्यात येणार असून, बिकडीनमधील फूड पार्कचे महिन्याभरात भूमिपूजन होईल, असे उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे सांगितले.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘विकास संवाद’ या कार्यक्रमात सरकार औरंगाबादसाठी काय करीत आहे, यावर ते बोलत होते. देसाई म्हणाले की, सरकारने १ लाख १६ हजार सामंजस्य करार केले आहेत. त्यातील मोठी गुंतवणूक या शहरात होईल, अशी अपेक्षा आहे. बिडकीन येथे फूडपार्कचे भूमिपूजन होताच तिथे प्लॉट वाटप सुरू होईल. एम.आर. कॉर्पोरेशन ही कंपनी अन्न प्रक्रिया करणारी दुबईतील मोठी कंपनी आहे. येथील शेतकरी यांच्यासोबत करार करून गोट, पोल्ट्री, भाजीपाला यावर प्रक्रिया करून ते अन्न निर्यात केले जाईल, अशी ती कंपनी आहे. शेतकरी संकटातून बाहेर काढण्यास या उद्योगाची मोठी मदत होईल, असे देसाई म्हणाले.