औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या ३० व्या दिवशी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सकाळी मुस्लीम बांधव घरातच ईदची नमाज अदा करतील. कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांना मशीद आणि ईदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करता येणार नाही. शासनाने यापूर्वीच कडक निर्बंध जाहीर केलेले आहेत.
यंदा एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात रमजान महिना आला. मुस्लीम बांधवांनी अत्यंत उत्साहात रमजान महिन्याचे स्वागत केले. शहराचे तापमान जवळपास ४० अंश असतानाही मुस्लीम बांधवांनी तीस दिवस रोजे ठेवले. बुधवारी देशभरात कुठेही चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे गुरुवारी ३० व्या दिवशी उपवास ठेवण्यात आला. सायंकाळी मगरीबची नमाज झाल्यानंतर चंद्रदर्शन झाले. मुस्लीम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना संसर्गामुळे यंदाही अत्यंत साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे. कोरोनापासून संपूर्ण जगाला मुक्ती मिळावी, अशी दुवा महिनाभर मुस्लीम बांधवांनी केली. ईदच्या नमाजनंतरही अशा पद्धतीची दुवा करण्यात येईल. उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी शहरातील एकाही इदगाह मैदानावर ईदची विशेष नमाज अदा करता येणार नाही. मागील वर्षीप्रमाणेच मुस्लीम बांधवांनी घरातच ईदची विशेष नमाज अदा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
शुक्रवारी रमजान ईद साजरी होणार हे निश्चित असल्याने रात्री शहरातील विविध विक्रेत्यांकडे नागरिकांनी गर्दी केली होती. ईदच्या दिवशी शिरखुरमा पदार्थ तयार करण्यात येतो.