छत्रपती संभाजीनगर : मोपेड दुचाकीवर मागे बसून बिनधास्त पोटच्याच लहान मुलीच्या हाती दुचाकी सोपविणाऱ्या बेजबाबदार वडिलांचा वाहतूक पोलिसांनी शोध लावला. हा ४२ वर्षीय इसम एका वॉशिंग सेंटरवर कामाला असून, बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पाेलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.
बुधवारी देशभरात या घटनेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा वायरल झाला. राज्यभरात अल्पवयीन मुलांच्या अपघातामुळे सातत्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. सहायक आयुक्त पाटील यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी या इसमाचा शोध सुरू केला. शुक्रवारी जाधव यांना रेल्वे स्थानकावर तशाच रंगाची दुचाकी मिळून आली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत चालकाला ताब्यात घेताच, मुलीचा वडील असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. त्यानंतर, त्याच्यावर रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात बीएनएस २८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार अशोक कदम, रवी दहिफळे, मनोहर पाटील, बाळू जाधव यांनी कारवाई पार पाडली.
आधी अभिमान, नंतर गयावयाव्हिडीओत अभिमानाने अंगठा दाखविणारा बाप शुक्रवारी वाहतूक कार्यालयात पोलिसांसमोर हात जोडून गयावया करत होता. त्याच्या कृत्याचे गांभीर्य कळल्यानंतर रडायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी त्याच्या माफीचा व्हिडीओ काढून त्याच्याकडून अल्पवयीन मुलांना वाहन देण्याचे आवाहन वदवून घेत, रात्री बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
हा अन्य पालकांना इशारापालकांनी अल्पवयीन पाल्यांच्या हाती गाडी देऊ नये. शुक्रवारचा हा गुन्हा त्यांच्यासाठी थेट ईशारा आहे. लहान मुले गाडी चालविताना दिसल्यास पालकांवर गुन्हा दाखल होईल.- धनंजय पाटील, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग.