वैजापुर : जुन्या भांडणाचा वाद मनात धरून नगरसेविकेच्या पुत्राला दुकानात घुसून मारहाण केल्याची घटना तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गटाने तर सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी धरीत पोलीस ठाण्यावर बुधवारी मोर्चा काढला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नगरसेविका पुत्र व पारस घाटे यांचा मोठा भाऊ सुरेश घाटे व राणा राजपूत यांचा वाद झाला. हे भांडण सोडवण्यासाठी राणा यास बोलावून घाटेंनी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून राणा राजपूत व त्याच्या साथीदारांनी पारस घाटे यांना सोमवारी त्यांच्या दुकानात घुसून बेदम मारहाण केली. याप्रकरणी पारस घाटे यांच्या फिर्यादीवरून राणा राजपूतसह त्यांच्या नऊ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला, तर मयूर राणा राजपूत यांनी देखील पारस घाटे, सुरेश घाटे यांच्याविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पारस घाटे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी राणा राजपूत यास अटक केली आहे. मात्र, अन्य आरोपी पसार असून सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत वैजापमर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले.