औरंगाबाद : जगात ५०० पेक्षा अधिक प्रकारचे खजूर मिळतात. १५० प्रकारचे खजूर भारतात विक्रीला येतात. त्यातील ७० नमुन्यांचे खजूर औरंगाबादेत विक्रीला आणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इराणच्या खजुराला शहरात सर्वाधिक पसंती मिळत आहे. प्रत्येक खजुराची चव वेगवेगळी असून, १०० रुपयांपासून ते ३ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत ते विकले जात आहे. यातील ३०० ते ६०० रुपये किलोदरम्यानच्या खजुराला अधिक मागणी आहे.
खजूरचा प्रकार एक असला तरी त्यातही लहान-मोठ्या आकारातील, लाल, पिवळ्या, काळ्या रंगातील, काही चिकट, तर काही कोरडी, काहींमध्ये बिया असलेले, तर बिगर बियांचे खजूर आहेत. काही खाण्यास एकदम रसगुल्ल्यासारखे, तर काही थोडे कडक. काही खजुरांचा रंग तर चॉकलेटसारखाच. तुमच्या समोर खजूर ठेवले की चॉकलेट हेच सुरुवातीला कळत नाही. खजुराची ही चवदार दुनिया अनुभवायची असेल तर त्यास खास खजूर विक्रेत्यांच्या दुकानातच जावे लागेल. काही विक्रेत्यांनी खजूर एसीमध्ये किंवा फ्रिजरमध्ये ठेवले आहेत. यामुळे हे खजूर तोंडात ठेवले की, एकदम थंडगार लागतात. रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दररोज सायंकाळी इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन पाणी पिऊन रोजा सोडण्याची प्रथा आहे.
खजुराचे आयातक अब्दील रखीब मजहर यांनी सांगितले की, सौदी अरेबिया, इराण, दुबई, ओमान, इराक, जॉर्डन, बेल्जियम, ट्यूनिशिया आदी देशांतून खजूर आयात केले जातात. आशिया देशातील लोक कलमी खजूर पसंत करतात, तसेच अज्वा खजुराची सर्वाधिक विक्री होते. औषधी म्हणूनही या खजुराचा वापर केला जातो. सौदी अरेबियातील अंबर (मोठ्या आकारातील) खजूर लोकांना जास्त आवडते. १२०० ते ३ हजार रुपयांदरम्यान प्रतिकिलो अंबर खजूर विकले जाते. भारतात येणाऱ्या एकूण खजुरामध्ये ७० टक्के खजूर इराणचा असतो. इराक येथील झेदी खजूर थोडा स्वस्त असतो. खजुराचे रंग,आकार व चवीनुसार अनेक नावे आहेत. त्या नावामागेही कहाणी आहे, असेही त्यांनी नमूद केले. शहारात किरकोळ विक्रीत १०० रुपयांपासून खजूर विक्री होत असले तरी त्यातही ३०० ते ६०० रुपये किलोदरम्यानचे खजूर जास्त प्रमाणात विक्री होतात.
रसगुल्ल्यासारखा खजूर बाजारात खजुरात अनेक प्रकार आहेत; पण एक ‘सुक्करी’ खजूर तोंडात ठेवल्यावर आपण रसगुल्ला खाल्ल्यासारखा भास होतो. चॉकलेटी रंगातील हा खजूर नरम आहे. ज्यांना दात नाही तेही हा खजूर आरामात खाऊ शकतात. उन्हाळ्यात या खजुराला अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेते शेख मुख्तार शेख नजीर यांनी दिली.
भेट देण्यासाठीही खजुराचा वापर रमजान महिन्यात शहरात खजुराच्या विक्रीत कोट्यवधींची उलाढाल होत असते. आता तर भेट देण्यासाठीही मिठाईऐवजी खजुराचा वापर केला जात आहे. नुकतेच सीबीएसईचे दहावी व बारावीचे निकाल लागले. त्यात विद्यार्थी पास झाले. त्यांनीही पेढे वाटण्याऐवजी खजूर वाटले, तसेच अनेक जण भेट देण्यासाठी पावशेर, अर्धा किलोचे खजुराचे बॉक्स तयार करून नातेवाईक, मित्रपरिवाराला देताना दिसून येत आहेत.