फुलंब्री : गर्भपात करण्यासाठी गरजेपेक्षा जास्तीच्या गोळ्या खाऊ घातल्याने रक्तस्त्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रेलगाव येथे घडली. याप्रकरणी महिलेच्या पतीविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेलगाव येथील बाळासाहेब गणपत क्षीरसागर हा मजुरीचे काम करतो. त्याला एक मुलगा, दोन मुली आहेत. त्याची पत्नी वैशाली बाळासाहेब क्षीरसागर (वय ३० वर्षे) यांना चौथे अपत्य होणार असल्याने ते होऊ नये म्हणून बाळासाहेब क्षीरसागर याने गर्भपाताच्या गोळ्या आणल्या व आवश्यकतेपेक्षा म्हणजे ४ ते ५ गोळ्या एकच वेळेला वैशाली यांना खाऊ घातल्या. या गोळ्याने वैशाली यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर बाळासाहेब याने वैशाली यांना उपचारासाठी मंगळवारी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तेथून औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले. घाटी येथे उपचार सुरू असताना वैशाली यांचा मंगळवारीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ मंगेश गोडसे याच्या तक्रारीवरून बाळासाहेब क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे करीत आहेत.