वाळूज महानगर (औरंगाबाद ) : तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे. प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांकडून कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगाराची कसून तपासणी केली जात आहे.
वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची ९ आॅगस्ट रोजी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण उद्योगनगरी हादरून गेली. तोडफोडीमुळे अनेक उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या धक्क्यातून सावरत उद्योजक सुरक्षेवर अधिक भर देताना दिसून येत आहेत. औद्योगिक वसाहतीत लहान-मोठ्या जवळपास ३ हजारांवर कंपन्या असून, लाखो कामगार काम करतात; मात्र बऱ्याच कामगारांची पूर्ण माहिती ना कंपनी व्यवस्थापनाकडे असते ना ठेकेदाराकडे. त्यामुळे त्या कामगारापर्यंत पोहोचणे बऱ्याचदा कंपनी व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणेला अवघड जाते.
प्रशासकीय यंत्रणेवर अधिक अवलंबून न राहता स्वत:च उद्योजकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक कारखान्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह संरक्षक भिंतीची उंची वाढविली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ केली जात आहे. या बाह्य सुरक्षा उपायांबरोबरच कारखान्याच्या आतील सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगारांचीही सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे, तसेच कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारालाही संबंधित कामगारांची सर्व इत्थंभूत माहिती संकलित करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून तंबी देण्यात आली आहे.
सुरक्षारक्षकामार्फत तपासणी कारखान्यात यंत्रसामग्रीबरोबरच उत्पादित केलेला पक्का माल असतो. हा माल थोडा जरी डॅमेज झाला तरी कंपनीचे नुकसान होते. शिवाय कंपनीत ज्वलनशील पदार्थही असतात. याची फार काळजी घ्यावी लागते. तोडफोडीच्या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कारखान्यातील वस्तूची चोरी होऊ नये, तसेच धोकादायक वस्तू, पदार्थ कारखान्यात जाऊ नये म्हणून कामगारांची सुरक्षा रक्षकामार्फत तपासणी केली जात आहे.