लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आर. के. कॉन्स्ट्रो फर्मचा मालक बिल्डर समीर मेहता याला २७ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याचे कळताच आणखी दहा ते पंधरा जणांनी मेहताविरुद्ध तक्रार करण्यासाठी बुधवारी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. या सर्वांना त्याने फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी मेहता याची पोलीस कोठडी ४ सप्टेंबरपर्यंत वाढविली.पोलिसांनी सांगितले की, तक्र ारदार विजय मदनलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र कमलकिशोर तायल, गोपाल अग्रवाल (रा.सिडको एन-३) यांच्या सिद्धिविनायक फर्मची हिरापूर येथील ५ एकर जमीन त्यांनी बिल्डर मेहता याला विकास करण्यासाठी दिली होती. करारानुसार फ्लॅट विक्रीचे २७ कोटी रुपये संयुक्त बँक खात्यात जमा न करता आरोपीने त्यांचा विश्वासघात केला. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी रात्री आरोपी बिल्डरला अटक केली. न्यायालयाने ठोठावलेली एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे तपास अधिकारी सुभाष खंडागळे यांनी न्यायालयास सांगितले. ते म्हणाले की, हिरापूर येथील त्याच्या गृहनिर्माण प्रकल्पातील इमारत एम आणि एनमध्ये प्रत्येकी १६ फ्लॅट होते. या दोन्ही इमारतींमधील ३२ फ्लॅट त्याने विक्री केले. हे फ्लॅट खरेदी करणाºया ग्राहकांनी बँकांकडून गृहकर्ज घेतले, असे असताना त्याने बांधकाम अर्धवट सोडून या दोन्ही इमारती बालदेव सुगनोमल (रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश) यांना ७ आॅक्टोबर २०१६ रोजी विकल्या. त्याच्याविरुद्ध आणखी अनेक तक्रारदार समोर आले. त्याने जमवलेली रक्कम कोठे लपविली याचा तपास करण्यासाठी दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
समीर मेहताविरुद्ध आणखी पंधरा तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:31 AM