औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देण्याच्या नावाखाली बिल्डरची झालेली फसवणूक ५० लाखांहून अधिक असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बिल्डरांकडून पैसे उकळणाऱ्या या फसवणूक प्रकरणातील मुख्य दोन सूत्रधारांना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीत तळ ठोकून असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयसिंगपुरा येथील बिल्डर मोहंमद आरेफोद्दीन यांना हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने खालेद राहगीब (रा. नवी दिल्ली), परवेज आलम (रा. शाहीन बाग, ओकला, नवी दिल्ली) आणि आबुसाद (रा. मुंबई) यांच्याविरोधात बेगमपुरा ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविला. बिल्डर आरेफोद्दीन यांना त्यांच्या व्यवसायाची दूरदर्शनवर जाहिरात करायची असल्याने त्यांच्या मित्रांमार्फत खालेद राहगीब आणि परवेज आलम यांच्याशी ओळख झाली होती.
बिल्डर आरेफोद्दीन यांच्याकडे मुबलक पैसा असल्याचे त्यांना समजताच त्यांनी त्यांना हज कमिटीचे चेअरमनपद मिळवून देतो, असे आमिष दाखविले. परवेज आलम आणि खालेद यांनी दोन टप्प्यात ३३ लाख बिल्डरकडून उकळल्याची प्राथमिक माहिती अहवालात नमूद केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना ही फसवणूक केवळ ३३ लाखांपुरती मर्यादित नसल्याचे समोर आले. परवेज आलम आणि खालेद राहगीब आणि आबुसाद यांच्याशिवाय अन्य लोकांचा यात समावेश असल्याचे समोर आले. त्यांनी आरेफोद्दीन यांना वेगवेगळी कारणे सांगून ५० लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे फसवणूक करताना त्यांनी रक्कम घेतली.
धनादेशाद्वारे घेतले ७० हजारटोळीने ५० लाखांहून अधिक रकमेची आरेफोद्दीन यांची फसवणूक केली. या रकमेपैकी केवळ ७० हजार रुपये त्यांनी धनादेशाच्या स्वरुपात घेतले होते. उर्वरित सर्व रक्कम रोख स्वरुपात घेतल्याचे तपासात समोर आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आरेफोद्दीन यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून परवेज आलम आणि खालेद यांना दिली.
पथक दिल्लीत तळ ठोकूनपरवेज आलम आणि खालेद यांना पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले. खालेद हा दूरदर्शनमध्ये कार्यरत आहे. असे असले तरी दोन्ही आरोपींसह मुंबईतील आबुसादसह अन्य आरोपी पसार झालेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.