गजेंद्र देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानची सुरूवात जिल्ह्यात धडाक्यात झाली असली तरी आता गती मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार २०७ कुटुंब संख्या असून, पैकी १ लाख ९६ हजार ९३० कुटुंबाकडे शौचालय आहे. मात्र, १ लाख ८४ हजार २७७ कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाही. दरम्यान, वडवणी तालुक्याने ९८ टक्के शौचालय बांधकामे पूर्ण केल्याने तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानास सुरूवात झाली. सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही पावणे दोन लाख कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचालयासाठी जातात. २०१२ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार कुटुंबांची नोंद आहे. मात्र अभियानाची गती मंदावल्याने ग्रामीण भागात शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.२ आॅक्टोबर २०१७ अखेर जिल्ह्यास उद्दिष्ट पूर्ती करावी लागणार आहे. मात्र, आगामी पाच महिन्यात उर्वरित पावणे दोन लाख कुटुंबांकडून शौचालय बांधकाम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. शौचालय बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, बचत गटाच्या सदस्यांची मदत घेऊन शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन करण्यात येत आहे. शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर १२ हजारांचे अनुदान देण्यात येते. मात्र अनेक ग्रामस्थांनी शौचालय बांधकामाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.
पावणदोन लाखांहून अधिक कुटुंबे शौचालयांविना
By admin | Published: May 29, 2017 10:40 PM