औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यास दुसऱ्या लाटेच्या दीडपट रुग्णसंख्या असेल, हे गृहीत धरून नियोजन करण्यासाठी विभागात सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतीच स्थापन केली.
एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात विभागात एकाच दिवशी ७७ हजार ४४२ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्या दिवसाची रुग्णसंख्या सर्वात जास्त होती. तज्ज्ञांनी आणि शासनाने त्या आकडेवारीचा आधार घेत विभागात तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण संख्या आढळल्यास आरोग्य सुविधांचे सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे. या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
विभागीय आयुक्तांनी सोमवारी (दि.२६) विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओंची ५ तास बैठक घेतली. त्यानंतर सहा जणांचे पथक गठित केले. महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वीणा सुपेकर, जगदीश मिनीयार, अविनाश पाठक, शिवाजी शिंदे आणि रश्मी खांडेकर यांचा टीममध्ये समावेश आहे. ही टीम विभागातील पूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची तयारी कशी आहे, याचा आढावा घेऊन उणिवा दूर करण्यासाठी काम करणार आहे.
या टीमने दोन दिवसात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा आढावा घेऊन सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसांत विभागातील पूर्ण जिल्ह्यात ही टीम जाणार असून तेथील औषधी, आरोग्य सुविधा, नवजात शिशू उपचार व्यवस्था, बालकांसाठी कोविड केअर सेंटरची व्यवस्था, डॉक्टर, नर्सचे प्रशिक्षण, ऑक्सिजन सिलिंडर्स साठा याची माहिती घेणार आहे.प्रशासन तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. नवजात शिशू, बालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना कसे हाताळावे, याचे प्रशिक्षणही विभागात पार पडले. बालरोग तज्ज्ञ उपलब्धतेची माहिती तयार आहे. नर्सेसना देखील प्रशिक्षण दिले आहे, असे प्रशासनाने सांगितले.
खाटा आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरच मुख्य लक्षप्राधान्याने बेडची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यावरच विशेष लक्ष देण्यात येणार आहे. ७७ हजार ४४२ अॅक्टिव्ह केसेस एप्रिल महिन्यात होत्या. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट आली तर दीडपट रुग्णवाढ होऊ शकते. म्हणजेच १ लाख रुग्ण आढळल्यास विभागात जिल्हा निहाय इन्फ्रास्ट्रक्चर सक्षम असले पाहिजे. त्यात काय कमतरता आहे. याचा आढावा पथक घेत आहे.