औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विळखा वाढत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २० दिवसांतच जानेवारीपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले. रुग्णांमध्ये दररोज मोठी भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा विळखा सुरू झाला. त्यानंतर तब्बल ७ महिने कोरोनाचा आलेख वाढता होता. ऑक्टोबरनंतर नव्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. जानेवारीपर्यंत म्हणजे, तीन महिने हा आलेख घसरता होता. या काळात दररोज दुहेरी संख्येतच रुग्णांचे निदान होत गेले. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडला आणि कोरोनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जानेवारीच्या ३१ दिवसांत जेवढे नवीन रुग्ण आढळले, त्यापेक्षाही अधिक रुग्ण फेब्रुवारीच्या गेल्या २० दिवसांतच आढळले आहेत.
जानेवारीत १, ३८३ नवीन रुग्ण आढळले. त्यातुलनेत १ ते २० फेब्रुवारीदरम्यान १,४५० नव्या रुग्णांची भर पडली.
राज्यासह औरंगाबाद जिल्ह्यातही पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापाठीमागे दुसरी लाट, कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात ये- जा होणाऱ्यांची संख्या पाहता औरंगाबाद जिल्ह्यातही ही भीती व्यक्त होत आहे. मात्र, नवीन स्ट्रेन नसल्याचा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, मात्र, खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे.
----
नवीन स्ट्रेन नाही
कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही, पण नवीन स्ट्रेन असो की जुना, खबरदारी यापूर्वी जी घेतली आहे, तीच आताही घ्यायची आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मोठी गर्दी होईल, असा लग्नसोहळा टाळावा.
-डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
जानेवारीत आढळलेले रुग्ण-१,३८३
फेब्रुवारीत आतापर्यंत आढळलेले रुग्ण-१,४५०