औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२७ कोटींच्या आर्थिक अनियमिततेचा कुलपती कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी मंगळवारी आढावा घेतला. या प्रकरणातील दोषींवर जबाबदारी निश्चिती व कारवाईला गती देण्याच्या सूचना राजभवनाकडून मिळाल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठातील चारशेहून अधिक अधिकारी आणि विविध प्राधिकरणाच्या दोषी सदस्यांवर शिस्तभंगासह वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी डॉ. धामणस्कर समितीच्या अहवालातून विद्यापीठात १२७ कोटींची अनियमितता झाल्याचे समोर आले. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची आग्रही मागणी झाल्यावर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी या अनियमिततेतील दोषींवर कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती. त्यासंदर्भात राज्य शासनाने कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांना पत्र दिले होते. या प्रकरणातील स्थापन अभ्यासगटाच्या अहवालाचा कुलपती कार्यालयाचे मुख्य सचिव अशोक कुमार यांनी मंगळवारी आढावा घेतला. या बैठकीस कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट, वित्त व लेखा अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत शिस्तभंगाची नोटीस दिलेल्या १२५ जणांसह अभ्यासगटाकडून अनियमिततेत समोर आलेल्या तीनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी असे चारशेहून अधिक जणांवर आरोपपत्र निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.
स्वतंत्र कक्षाची स्थापनाआर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात कारवाईसंदर्भात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. दिलेल्या नोटीस, त्याला आलेली उत्तरे, अनियमिततेतील वसुली यासंदर्भात विधिज्ञ व्यक्तीची नेमणूक कुलगुरू करतील, असे प्रकुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट म्हणाले.
कारवाईचा पेच सुटेना
आर्थिक अनियमिततेत अनेक प्राधिकरण सदस्यांचा समावेश आहे. मात्र, त्या समित्यांचे अध्यक्ष कुलगुरू असतात. विद्यापीठाला कुलगुरूंवर कारवाईचे अधिकार नसल्याने त्यासंदर्भात शासनाला मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्याबद्दल अद्याप स्पष्टता नसल्याने कारवाईतील पेच सुटलेला नाही, असे प्रकुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ म्हणाले.
आरोपपत्र, शिस्तभंग, वसुलीची कारवाईडाॅ. धामणस्कर समितीच्या अहवालासंदर्भात स्थापन अभ्यासगटाच्या अहवालानुसार या प्रकरणात दोषींवर जबाबदारी निश्चिती करत आहोत. तसेच आरोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर विधिज्ञ नेमून शिस्तभंग व वसुलीची कारवाई सुरू होईल.
-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू