वाळूज महानगर : बजाजनगरातील मोरे चौकाच्या सुशोभिकरण व रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून कासवगतीने सुरु आहे. वाढीव मुदतीनंतरही या चौकाचे काम अपूर्णच असल्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहेत. या चौकातील मलबा व साहित्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून, रखडलेले काम त्वरीत पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एमआयडीसी प्रशासनाकडून बजाजनगरातील मोरे चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा निधी देण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ऋषीकेश ग्रुपच्या मुकुंद गाडेकर या ठेकेदाराने कामाला सुरवात केली होती. या मुख्य चौकात डांबरीकरणाचे काम करुन दोन्ही बाजूला साधारणत: १०० मीटरपर्यंत फुटपाथ तयार करणे, सांडपाणी वाहुन जाण्यासाठी आरसीसी गटार नालीचे बांधकाम करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामाला सुरवात करण्यात आली होती. आतापर्यंत गटार नालीचे काम पूर्ण करण्यात आले असून, पेव्हर ब्लॉकचे काम सुरु आहे.
कामाच्या कासवगतीमुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुशोभिकरणासाठी खोदकाम केल्यामुळे या चौकात खड्डे पडले असून, रस्त्यावर खडी इतरत्र पसरली आहे. वाळूज औद्योगिकनगरीतजाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.
बजाजनगरातील मोहटादेवी चौक, लोकमान्य चौक, सिडकोमहानगर, जागृत हनुमान मंदिर आदी भागातील नागरिकांना वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. सांयकाळपासून रात्री उशिरापर्यंत या चौकात वाहतुकीची कोंडी होऊन लहान-मोठे अपघात होतात. विशेष म्हणजे या चौकात दोन राष्टÑीयकृत बँका, महाविद्यालय असल्यामुळे ग्राहक व विद्यार्थ्यांची या चौकात कायम गर्दी असते.वाढीव मुदतीनंतरही काम अपूर्णच
या चौकाचे काम सुरु असताना महावितरण व बीएसएनएलच्या केबलचे नुकसान झाल्याने काम रोखण्यात आले होते. आता सर्व सोपस्कर पूर्ण होऊनही या चौकाच्या सुशोभिकरणाचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिक व वाहनधारकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या चौकाचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे, यासाठी काँग्रेसतर्फे निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा अर्जुनराव आदमाने, सिद्राम पारे, सुरेश गाडेकर आदींनी दिला आहे.संबधित ऋषीकेश ग्रुपने नियोजित मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्यानंतर संबधित ठेकेदारास वाढीव मुदत देण्याची आली. मात्र, तरीही मुदतही सप्टेंबर महिन्यात संपली असून, काम अपूर्ण असल्यामुळे संबधित ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.- गणेश मुळीकर, सहा.अभियंता, एमआयडीसी.