घोसला ( छत्रपती संभाजीनगर) : मोसंबी फळबागेवर अज्ञात रोगाची लागण झाल्याने झाडे पिवळी पडून वाळून गेली असून, पानगळही होत आहे. यामुळे वैतागून सोयगाव तालुक्यातील शिंदोळ येथील एका शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्राची फळबाग उपटून फेकली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शिंदोळ येथील शेतकरी भाऊराव दगा सोनवणे यांनी गट नंबर ४७ मधील दोन एकर क्षेत्रात मोसंबीची लागवड केलेली आहे. भरपूर उत्पन्न होईल, या आशेने गेल्या पाच वर्षांपासून मोठा खर्च आणि खूप मेहनत करून सोनवणे यांनी ही फळबाग जोपासली. पाच वर्षांनंतरच या मोसंबीच्या झाडाला फळे येतात. मात्र, फळे येण्याच्या वेळेलाच या फळबागेवर अज्ञात रोगाची लागण झाली आहे. यामुळे झाडे पिवळी पडली असून, ती वाळून जात आहेत. याशिवाय पानगळही होत आहे. यामुळे सोनवणे हवालदिल झाले असून, या रोगाचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधीची फवारणी, उपाययोजना त्यांनी केल्या. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर वैतागून त्यांनी फळबाग उपटून फेकली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अज्ञात रोगाची लक्षणेसततच्या होत असलेल्या पावसाने मोसंबी फळबागावर अज्ञात रोगाची लक्षणे आढळून येतात. यामुळे फळे पिवळी पडून त्याची गळती होती. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होते. त्यावर कृषी विभागाकडून उपाययोजना करता येऊ शकतात.- विजयसिंग निकम, कृषी सहायक, सोयगाव