औरंगाबाद : बँकेची एजंट कंपनी सकाळीच एटीएममध्ये नोटा भरतात व अवघ्या काही तासांत ते रिकामे होऊन जाते. यामुळे नागरिकांना एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमवर चकरा माराव्या लागत आहेत. ही सत्य परिस्थिती असतानाही बँकेचे अधिकारी मात्र, नोटा टंचाई नसल्याचे सांगत आहेत. तांत्रिक कारणांमुळे नोटा एटीएममधून निघत नसल्याचे सांगितले जात आहे. कारण, काही असले तरी एटीएम कार्डधारकांना त्रास होत आहे.
रिझर्व्ह बँकेने शहरासाठी मार्च महिन्यात ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. तरी पण, एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच एटीएममध्ये खडखडाट जाणवू लागला आहे. आजही अनेक अधिकारी, कर्मचारी आपला पगार एटीएममधूनच काढतात. त्यातही अनेक जण एकदम पगार काढत नाहीत. आवश्यकतेनुसार एटीएममधून रक्कम काढली जाते. सध्या महिनाअखेरचे दिवस सुरू आहेत. आता लग्नसराई व अन्य कामासाठी पैसे लागतात. यामुळे नागरिकांच्या एटीएममध्ये चकरा वाढल्या आहेत. पण सिडको, एमजीएम रोड, हडको, पुंडलिकनगर, गारखेडा रोड, उल्कानगरी, झांबड इस्टेट रस्ता, रेल्वेस्टेशन रस्ता, बीड बायपास याठिकाणी आमच्या प्रतिनिधीने फिरून माहिती घेतली असता, अनेक एटीएममधून नागरिक खाली हात बाहेर पडत असल्याचे दिसून आले. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकांचे काही एटीएम वगळता अन्य एटीएममध्ये दुपारनंतर खडखडाट निर्माण झाला होता.
एसबीआयचे एटीएम विभागाचे अधिकारी सर्व एटीएममध्ये दररोज नोटा भरल्या जात असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र रोख रकमेसाठी भटकावे लागत आहे. शहरात व आसपासच्या परिसरात सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँकांचे मिळून ७०० एटीएम आहेत. त्यातील किमान ६० टक्के एटीएममध्ये नोटा नसल्याचे आढळून येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, रिझर्व्ह बँकेने नागपूर येथून मार्च महिन्यातच शहरातील बँकांच्या पाच करन्सी चेस्टमध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांच्या नोटा पाठविल्या होत्या. त्यातील काही रक्कम एटीएमसाठी दिली जाते. पहिले बँकेत काऊंटरवर येणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य दिले जाते. एका एटीएममध्ये ३० लाख रुपयांच्या नोटा बसतात.
एटीएममध्ये एकदाच भरली जाते रक्कम बँकेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, बँकांनी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम आऊटसोर्सिंगद्वारे होते. ज्या एजन्सीज्ला काम दिले त्या दिवसातून एकदाच एटीएममध्ये नोटा भरतात. त्यानंतर दिवसभर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. यामुळे एटीएममध्ये नोटा संपल्या तर दुसऱ्या दिवशीच त्या भरल्या जातात. यामुळे खडखडाट जाणवत आहे.
काही एटीएममध्ये तांत्रिक बिघाड शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ एटीएम असे आहेत की, त्यात तांत्रिक बिघाड होऊन मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. याविषयी एटीएम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएम दुरुस्त करण्याची प्रक्रिया मोठी आहे. बँक व्यवस्थापक त्याची माहिती मुख्यालयाला कळवितात. तेथून संबंधित आऊटसोर्सिंग एजन्सीला कळविले जाते. ती एजन्सी इंजिनिअरला पाठविते व एटीएमची तपासणी करून खर्चाची यादी देते. त्यानुसार टेंडर काढले जातात व नंतर एटीएमची दुरुस्ती केली जाते. यास अनेक दिवस लागतात.