औरंगाबाद : दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास मोठ्या धामधुमीत साजरा होतो. व्रत-वैकल्य आणि अधिकाधिक धार्मिक कामे करण्याला या महिन्यात महत्त्व असते. याशिवाय अधिकमासात विशेष भाव खाऊन जातात ते जावई लोक. सोने, चांदी, तांबे या वस्तूंचे वाण देण्यामुळे पुण्यसंचय होतो, असा समज असल्यामुळे सध्या जावयासाठी सोने-चांदी खरेदी उत्साहात सुरू असून, अधिकमास जावयांसाठी जणू पर्वणीच ठरत आहे.
पुरुषोत्तम मास म्हणूनही अधिक महिना ओळखला जातो. सध्या घरोघरी लेक-जावयाला जेवायला बोलावून पुरणाचे ‘धोंडे’ खाऊ घालणे आणि ३३ अनारशांचे वाण देणे हा कार्यक्रम उत्साहात सुरू आहे. यासोबतच जावयांना कपड्यांबरोबरच सोन्या-चांदीच्या वस्तूंचा आहेर करण्यात येत असल्यामुळे कपडा व्यापारी आणि सोनारांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.याविषयी माहिती देताना सोनारांनी सांगितले की, जावयासाठी खास सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, साखळी, चांदीचे दिवे, ताट, वाटी, पूजेच्या साहित्याचा सेट, तांबे- भांडे, ताम्हण, समई या गोष्टींना सध्या खूप मागणी आहे. याशिवाय जावयासाठी सोन्याची वेढणी किंवा तुकडा खरेदी करण्यासाठीही ग्राहक येत आहेत. जावयांसाठी या वस्तू घेतल्यावर मुलींसाठी जोडवी, पैंजण, मणी- मंगळसूत्र या वस्तू खरेदी केल्या जात आहेत.
‘रेडिमेड’ वाणाला मिळतेय पसंतीहौसे- मौजेने घरोघरी धोंडा साजरा होत असला तरी अनेकदा काही ठिकाणी वेळेअभावी अनारशांच्या वाणाची तयारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या अनारशांच्या ‘रेडिमेड’ वाणाला जोरदार मागणी आहे. १८० ते २५० रुपये या दरात ३३ अनारशांची विक्री होत आहे. जास्त दर आकारून ताट किंवा भांड्यात सुशोभित करूनही अनारशांच्या वाणाची विक्री होते आहे.