औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होते आणि त्यांना अडचणीही अनुभवास येतात. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी शहराला सर्वाधिक पसंती देताना पारंपरिक शिक्षण शाखेत वाणिज्यला ४१ टक्के कौल दिला आहे. ‘तुम्हाला काय व्हायला आवडेल’ या प्रश्नावर या विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सनदी अधिकारी टाळून सर्वाधिक पसंती ‘इतर’ पर्यायाला दिली.या पाहणीसाठी औरंगाबाद शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे ८६ टक्के विद्यार्थ्यांनी शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यास पसंती दिली. ५४ मुले व ३० मुलींनी शहरातील, तर शहराबाहेर शिक्षणास १० मुलांनी व ३ मुलींनी पसंती दिली.विज्ञान शाखेला २८ टक्के पसंती मिळाली असताना तंत्रनिकेतनच्या वाट्याला केवळ ४ टक्के व तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारल्यावर केवळ १३ टक्क्यांनी इंजिनिअरिंगची आवड सांगितली. शिक्षण महाग झाल्याचे तर तब्बल ७२ टक्क्यांचे मत आहे. ७२ टक्के विद्यार्थ्यांनी ठरवून महाविद्यालयाची निवड केली असल्यामुळे त्यांना कोठे काय शिकायचे याच्या नियोजनाची जाणीव झाली. अॅडमिशनसाठी कोणतीही अडचण आली नाही, असा ५५ टक्क्यांचा अनुभव असल्यामुळे महाविद्यालयांनी आपापल्या पातळीवर विद्यार्थ्यांना अॅडमिशनला अडचणी येणार नाहीत, अशी व्यवस्था केल्याचे दिसते. शाखा निवडण्यातही केवळ १५ टक्के मुले व मुली आपल्या पालकांवर अवलंबून होत्या. त्यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. ७८ टक्क्यांनी स्वत:हून शाखा निवडून आपण शिक्षणाबाबत स्वतंत्रपणे विचार करतो, असे सिद्ध केले. यात ४९ मुले व २७ मुली होत्या. सनदी अधिकारी होण्याचा विचार १० टक्के विद्यार्थ्यांनी केला व केवळ ३ टक्के वकील होऊ इच्छितात. वकिली हे सर्वाधिक नापसंतीचे क्षेत्र ठरले. व्यावसायिक अभ्यासक्रमाला ७ टक्केच विद्यार्थ्यांची पसंती मिळाली. त्यांच्यापर्यंत या अभ्यासक्रमांची माहिती पोहोचली नसावी, हे सिद्ध करते का? मित्राने सांगितले म्हणून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्के आहे. ४७ टक्के विद्यार्थी ‘इतर’ हा पर्याय तुम्हाला काय आवडेल असे विचारल्यावर निवडतात; परंतु त्यांना नेमके काय हे सांगता आलेले नाही.मौजमजा आणि अभ्यासही...महाविद्यालयीन जीवनाविषयी तुमच्या कल्पना काय? यावर मुले व मुली मोकळेपणाने बोलले. त्यांनी स्वप्नपूर्ती, एन्जॉयमेंटसाठी तर काहींनी जीवन मनमोकळेपणाने जगता येते, असेही सांगितले. महाविद्यालयीन जीवनाला करिअरचा महत्त्वाचा टप्पा समजणारे तसेच मौजमजा करताना अभ्यासही करणार असल्याचे ते म्हणतात. महाविद्यालयीन जीवन हे आयुष्य घडविण्याचे माध्यम असून त्यामुळे जीवनाला वळण लागेल, असेही त्यांना वाटते.
दहावीनंतरच्या शिक्षणात सर्वाधिक पसंती वाणिज्यला
By admin | Published: June 29, 2014 12:57 AM