वाळूज महानगर : अज्ञात माथेफिरूने घरासमोरील उभ्या दुचाकीला आग लावल्याने भडका उडून घराला आगीचा वेढा पडला होता. मात्र, वेळीच आग विझविण्यात यश आल्याने महिलेसह दोन मुले बालंबाल बचावली आहेत. ही घटना सोमवारी पहाटे वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली असून, घराचेही मोठे नुकसान झाले आहे.
अंकुश रुखमनबाई चंदन (३०, रा. फुलेनगर, वडगाव कोल्हाटी) हा पत्नी कविता (२७) व मुली अंकिता (६) आणि वेदिका (३) यांच्यासह वडगावात राहतो. सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मित्र सुरेश गौडा व शिवप्रसाद जैन यांच्यासोबत कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाला. त्यामुळे कविता मुलींसह घरात झोपली होती. दरम्यान, पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घरात विद्युत बोर्ड जळाल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने कविता उठली असता तिला घरात धूर दिसला. तिने बाहेर येऊन पाहिले असता घरासमोर आग लागल्याचे दिसून आले. कविताने अंकुशशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अंकुश मित्रासह घराकडे परत आला. तेव्हा घरासमोर उभी असलेली दुचाकी, कबुतर ठेवण्याचा पिंजरा, पाण्याची टाकी व पानटपरीला आग लागली होती. अंकुश व त्याच्या मित्रांसह शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझविली. या घटनेत दुचाकी (एमएच-२०, ईझेड-१८३६), पाण्याची टाकी जळून भस्मसात झाली असून, लाकडी पिंजरा, पानटपरी, घराचे पत्रे, विद्युत वायर जळाल्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन संशयित ताब्यातअंकुश चंदन याचा काही दिवसांपूर्वी दुचाकी फोडल्याच्या संशयावरून गावातील काही तरुणांसोबत वाद झाला होता. मात्र, गावातील नागरिकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण पोलीस ठाण्यात मिटवून घेण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी पहाटे चंदन याची दुचाकी अज्ञात माथेफिरूने जाळली. त्यामुळे अंकुश याने गावातील तिघा तरुणांवर संशय व्यक्त केला असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.