सिल्लोड / पळशी : तालुक्यातील पळशीत ४७ वर्षीय आई व २७ वर्षीय विवाहित लेकीने राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. आई विधवा तर लेकीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झालेले असून ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिच्या अडीच वर्षांच्या मुलीलादेखील २७ वर्षीय आईने गळफास देऊन संपविण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून ती फासातून निसटून खाली पडल्याने बालंबाल बचावली.सुनीता भारत साबळे (४७. रा. पळशी), जागृती अनिल दांगोडे (२७, रा. चिकलठाणा, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. तर गळफासातून बालंबाल बचावलेल्या चिमुकलीचे राजकन्या अनिल दांगोडे असे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये, माझे पती मला पैसे मागत असून नैराश्य आल्याने आम्ही चौघी आत्महत्या करीत आहोत, असे म्हटले आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे मायलेकी व अडीच वर्षांची राजकन्या झोपी गेल्या. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिमुकली घरातून रडत बाहेर पडली. तेव्हा तिच्या गळ्याला दोरीचा फास आवळलेला होता. शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला पाहून धाव घेतली. घरात प्रवेश केला असता सुनीता व जागृती या मायलेकी फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. नागरिकांनी धाव घेत सिल्लोड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोनि. सीताराम मेहेत्रे, संदीप कोथलकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर पळशीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार आले.
पहिल्या पतीची सासरी आत्महत्याजागृती दांगोडे हिचे तीन वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते. तिच्या पतीने सासरी म्हणजे पळशीत एका वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जागृतीने सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. ती चार महिन्यांची गर्भवती होती. राजकन्या ही तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आहे.
आई, मुलगी विधवा, आता राजकन्या झाली अनाथमयत जागृती लहान असताना तिच्या वडिलांनी २००५ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आई सुनीता विधवा झाली होती, तर जागृतीचे वडील छत्र हरवले होते. त्यानंतर आई सुनीता वडिलांकडे (पळशी) राहत होती. सुनीताबाईने मुलगी जागृतीला लहानाचे मोठे करून तिचे लग्न लावून दिले. जागृतीला राजकन्या नावाची मुलगी झाली, परंतु राजकन्या दीड वर्षाची असतानाच तिच्या वडिलांनी गतवर्षीच गळफास घेतला हाेता. त्यानंतर आई सुनीतासह नातेवाइकांनी जागृतीला धीर देऊन सहा महिन्यांपूर्वीच तिचा पुनर्विवाह करून दिला. मात्र, शुक्रवारी नैराश्यातून दोघी मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलले.
नशीब बलवत्तर म्हणून वाचली राजकन्यामायलेकीने गळफास घेताना लेक जागृतीने स्वत:च्या गळ्यात आधी फास लटकावला व चिमुरड्या राजकन्येला दोराने फाशी देऊन ती गळफास घेणार होती. पण चिमुरडी राजकन्या दोरातून निसटली आणि वाचली अन् जागृती फासात अडकली. काही सेकंदात राजकन्याची आई जागृती आणि आजी सुनीता यांची प्राणज्योत मालवली.