औरंगाबाद: कौटुंबिक कलहाला कंटाळलेल्या विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता पैठण रोडवरील गेवराई तांडा परिसरात उघडकीस आली.
वैशाली रवींद्र थोरात ( २५), आरोही (६) व आयुष (३), अशी मृतांची नाव आहेत. क्रांतीनगर हे महिलेचे माहेर असून, गेवराई हे तिचे सासर आहे. पती रवींद्र सोबतच्या भांडणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे. परिसरातील पडीक विहिरीकडे वैशाली आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन जातांना गावातील काही लोकांनी पाहिले. तिने मुलांसह उडी घेतल्याचे समजल्याने घटनेची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पाटील तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक अधिकारी विजय राठोड आणि अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशाली, आरोही आणि आयुषचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. घटनास्थळी मयताचे नातेवाईक जमा झाले होते.
अन् त्यांनी फोडला हंबरडा...
अग्निशामक दलाच्या पथकाने पडीक विहिरीतून तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले तेव्हा नातेवाईकांनी हंबरडा फोडला. स्थानिकांच्या डोळ्यातही अश्रू आले होते.
पती पसार, शोध सुरू...
मृतदेह, शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. कलहानंतर पती रवींद्र थोरात हा पसार झाला आहे. त्याचा शोध सायंकाळपर्यंत पोलिसांना लागलेला नव्हता.
आत्महत्येचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत...
आत्महत्येचे कारण प्रथम दर्शनी कौटुंबिक कलह असावा, परंतु नक्की काय कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सध्या चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.
कॅप्शन... वैशाली थोरात या विवाहितेने आरोही,आयुष या दोन चिमुकल्यांना घेऊन गुरूवारी गेवराई येथे पडीक विहिरीत आत्महत्या केली.