औरंगाबाद : माहेरातील एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीला माहेरी जाण्यास परवानगी देत नव्हता. त्यामुळे पत्नीच्या आईने मुलीला माहेरी का पाठवत नाही, असा जाब विचारत जावयाला नोकरीच्या ठिकाणी जाऊन बेदम मारहाण केली. घरी आल्यावर घडलेल्या घटनेची माहिती सांगितल्यानंतर पत्नीसोबत भांडण झाले. या छळाला कंटाळून पतीने शुक्रवारी रात्री दहा वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नी व सासूविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गारखेडा परिसरातील भरतनगर येथील संजय भागाजी कांबळे (३२) यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता आत्महत्या केली. या प्रकारानंतर मयताची आई रत्ना भागाजी कांबळे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मयताची पत्नी आणि सासूविरोधात मुलांचा छळ केल्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार दिली होती. यावरुन पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताच्या पत्नीचे माहेरातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नी माहेरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला भेटत असे. त्यासाठी सासु मुलीला मदत करीत असे. याची माहिती पतीला झाल्यानंतर त्याने पत्नीला माहेरी पाठविणे बंद केले. त्यामुळे सासु व पत्नी सतत त्याला त्रास देत होत्या. मयत कामगार चौकातील रिलायबल कटन टेस्टिंग या ठिकाणी कामाला होता. कामावर असतानाच सासूने त्याठिकाणी येत माझ्या मुलीला माहेरी का पाठवत नाहीस, असे म्हणत संजयला बेदम मारहाण केली.
घरी आल्यानंतर मयताने घडलेला प्रकार आई व पत्नीस सांगितला. तेव्हा पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त दिपक गिऱ्हे, सहायक पोलीसआयुक्त रविंद्र साळोंखे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निसार शेख अधिक तपास करीत आहेत.