औरंगाबाद : प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला तिच्या मातेसमोरच एक जणाने चटके देऊन आणि बेदम मारहाण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मुकुंदवाडी गावात घडली. या खळबळजनक घटनेप्रकरणी २४ एप्रिल रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तुषार रावसाहेब पवार (रा. राहुलनगर, कातपूर, पैठण) आणि सुमन (नाव बदलले) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी सुमन यांना दोन मुली आणि एक मुलगा, अशी अपत्ये आहेत. दीड वर्षापूर्वी सुमनच्या पतीला अर्धांगवायूचा आजार झाला. यानंतर पतीसोबत राहण्याऐवजी सुमन दोन मुली आणि मुलाला घेऊन औरंगाबादेतील मुकुंदवाडी येथे राहण्यास आली. तुषार आणि सुमन यांच्यात प्रेमसंबंध आहेत. यामुळे तुषार सुमनच्या घरी सतत ये-जा करीत असे.
सात ते आठ दिवसांपूर्वी तुषार सुमनच्या घरी आला. त्यावेळी पाच वर्षीय स्वाती घरी होती. स्वाती आणि सुमन तिला घराबाहेर जा असे सांगत असे. मात्र स्वाती घरातून बाहेर जाण्यास नकार देते. स्वाती त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने चिडलेल्या तुषारने स्वातीला स्वयंपाकघरात नेऊन गॅसवर वाटी गरम करून तिच्या गुप्तांगाला चटके दिले. एवढेच नव्हे तर तिच्या आईसमोर तिला बेदम मारहाण केली. तिच्यासोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढली. या सर्व प्रकारामुळे स्वाती आजारी पडली. या प्रकाराची कोठेही वाच्यता करू नये म्हणून सुमन आणि तुषारने तिला धमकावले.
मामामुळे घटनेला फुटले बिंगदोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी गावात राहणारा स्वातीचा मामा घरी आला. तेव्हा त्याला स्वाती तापेने फणफणलेली दिसली. स्वातीची अवस्था पाहून त्याने याविषयी सुमनकडे विचारणा केली. मात्र, सुमनने भावालाही उलटसुलट उत्तरे दिली. स्वाती सुमनसोबत राहिली तर तिचे बरेवाईट होईल, ही बाब मामाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी माहिती स्वातीच्या चुलत्यांना फोन करून स्वातीची तब्येत खराब असून तिला तुम्ही घेऊन जा, असे कळविले.
चुलत्याने केली सुटकास्वातीचे चुलते लगेच औरंगाबादेत आले आणि तिच्या मामाच्या मदतीने ते सुमनच्या खोलीत गेले. तेव्हा तेथे स्वाती एकटीच खोलीत होती. सुमन खोलीत नव्हती. तेथे त्यांना तुषारचे आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे आढळली. स्वातीला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा आठ दिवसांपूर्वी तुषारने चटके देत मारहाण केल्याचे रडतच स्वातीने त्यांना सांगितले.
चुलत्याने नोंदविली पोलिसांत तक्रारयानंतर स्वातीच्या चुलत्याने मुकुंदवाडी ठाणे गाठून तुषार आणि सुमनविरोधात तक्रार नोंदविली. यानंतर स्वातीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर ते स्वातीला घेऊन गावी रवाना झाले. पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मीरा चव्हाण तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.