छत्रपती संभाजीनगर : एड्स, एचआयव्ही म्हटले की, आजही लोक रुग्णांपासून दूर पळतात. मात्र, रुग्णांपासून दूर पळण्यापेक्षा त्यांना आधार देण्याची गरज आहे. औषधोपचाराने रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो. इतकेच काय एचआयव्ही पाॅझिटिव्ह दाम्पत्यांचे होणारे बाळ संसर्गमुक्त (निगेटिव्ह) होणे शक्य झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत गरोदरमाता पाॅझिटिव्ह असताना २९ बाळांनी एचआयव्हीला पराभूत करून संसर्गमुक्त श्वास घेतला.
दरवर्षी १ डिसेंबर रोजी ‘जागतिक एड्स प्रतिबंध दिन’ पाळण्यात येतो. जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी होत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, तरीही एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांत जिल्ह्यात ३८६ एचआयव्हीग्रस्त आढळल्याचे समोर आले.
शासनाकडून बाधितांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार मिळतो. सकस आहार, औषधोपचार यातून रुग्ण सर्वसामान्यांसारखेच आयुष्य जगू शकतो. रुग्णासोबत राहिल्याने कोणताही धोका नसतो. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
जिल्ह्यातील तपासण्या व आढळलेले रुग्णवर्ष - तपासणी - एचआयव्ही - पॉझिटिव्ह टक्केवारी२०१८-७८,९२५-५७९-०.७३ टक्के२०१९-१,०५,१२५-५१६-०.४९ टक्के२०२०-९४,०९३-३०४-०.३२ टक्के२०२१-१,०१,९३७-३४९-०.३४ टक्के२०२२-१,४५,८३१-३९८-०.२७ टक्के२०२३ (ऑक्टोबरपर्यंत)-१,६०,०३०-३८६-०.२४ टक्के
औषधोपचाराने शिशू संसर्गमुक्तएप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ३० एचआयव्हीबाधित गरोदरमातांची प्रसूती झाली. यातील २९ शिशू संसर्गमुक्त राहिले. औषधोपचारामुळे हे शक्य झाले. ‘एचआयव्ही’ग्रस्तांना आपुलकीची वागणूक दिली पाहिजे.- साधना गंगावणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय
दरमहा पाच हजारांची औषधी मोफतसेंटरमध्ये ‘एचआयव्ही’ग्रस्तांना दरमहा पाच हजार रुपयांची औषधे मोफत दिली जातात. औषधोपचारामुळे आई-वडील दोघे एचआयव्ही पाॅझिटिव्ह असले तरी होणारे बाळ निगेटिव्ह राहणे आता शक्य झाले आहे.- डाॅ. मधुकर साळवे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ‘एआरटी’ सेंटर, घाटी