लातूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या जयघोषात गुरुवारी शहर व जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी भक्तीमय वातावरणात महाराष्ट्राच्या कुलस्वामिनींची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली़ तसेच घरोघरी देवीची आराधना करुन मंगलमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली़ अश्विन शुध्द प्रतिपदेपासून सुरु झालेला हा शारदीय नवरात्रोत्सव ं२ आॅक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे़ गणेशोत्सव पार पडल्यानंतर भाविकांना ओढ लागते ती नवरात्रोत्सवाची़ त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून घरोघरी संपूर्ण स्वच्छतेचे काम सुरु होते़ तसेच विविध देवी भक्तांकडून या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत होती़ शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी सकाळपासून भाविकांची घटस्थापनेसाठी तयारी सुरु होती़ घटस्थापनेसाठी मातीचे घट, काळी माती, कळस, ज्वारीचे कणीस, कडधान्य, आंब्याची पाने, विड्यांची पाने, नारळ यासह फुलांच्या माळा आवश्यक असल्याने भाविकांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळत होती़ शहरातील गंजगोलाई, हनुमान चौक, सुभाष चौक, दयानंद गेट, औसा रोड, अंबा हनुमान या ठिकाणी पूजेच्या साहित्याची विक्री करणारी दुकाने थाटली होती़ या साहित्य दुकानांवर ग्राहक आवश्यक वस्तू खरेदी करण्यात मग्न झालेले पहावयास मिळत होते़ शहरातील गंजगोलाईतील मंदिरात पारंपारिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली़ तसेच देवीभक्तांनीही देवीची आराधना करुन प्रतिष्ठापना केली़ त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते़ शहरातील देवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती़ (प्रतिनिधी)
आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ
By admin | Published: September 26, 2014 1:18 AM