औरंगाबाद : वाळूज येथे राहणाऱ्या भाच्याचे लग्न आटोपून दुचाकीवरून गावी निघालेल्या माय-लेकास समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही माय-लेक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नवीन बायपास रोडवरील गांधेली शिवारात घडली.
कौशल्याबाई किशन धोत्रे (४५) व ज्ञानेश्वर किसन धोत्रे (२५, दोघेही रा. राजपिंप्री, ता. गेवराई, जि. बीड), अशी या अपघातात मरण पावलेल्या माय-लेकाची नावे आहेत. वाळूज येथे कौशल्याबाई धोत्रे यांचा भाऊ राहत असून त्याच्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. लग्नसमारंभ व पाहुणचार घेऊन हे दोघे माय-लेक रविवारी दुपारी सोलापूर- धुळे महामार्गाच्या नवीन बीड बायपासवरून मोटारसायकलने (एमएच२३- व्ही- १८६२) गावी निघाले होते. नवीन बायपासवरून जाताना गांधेली शिवारात समोरून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच २०- इइ- ७४५५) ज्ञानेश्वर चालवत असलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे माय-लेक हे दूरवर फेकले गेले. दुचाकी व कारचेही या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, सहायक फौजदार काशिनाथ लुटे आणि हवालदार संपत राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लगेच जखमी माय-लेक व कारचालक रावसाहेब बाबूराव मदगे (रा. एकोड पाचोड, ता. औरंगाबाद) यांना घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. कारचालक रावसाहेब मदगे हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.