औरंगाबाद : रस्त्याने चालत घरी जात असलेल्या युवकास दारू पिण्यास पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिविगाळ केली. त्यानंतर घरी पोहचलेल्या युवकाच्या घरात घुसून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेल्या त्याच्या आई, काकीसह इतर महिलांनाही दांड्याने मारल्याचा प्रकार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दलालवाडीत घडला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गांधीनगर येथील चौघांच्या विरोधात २३ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविला आहे.
अक्षय चावरिया, शुभम चावरिया, प्रीतम चावरिया आणि पवन चावरिया (सर्व रा. गांधीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. दलालवाडी येथील अश्विन जांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ते वडिलांच्या हॉटेलवरून घरी जात होते. तेव्हा त्यांना आरोपी अक्षय, शुभम, प्रितम आणि पवन चावरिया यांनी रस्त्यात थांबवत दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, अश्विन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिविगाळ केली. त्यामुळे ते घाबरून घरी गेले. घरी गेल्यानंतर काही वेळातच चारही आरोपी घरात घुसले. त्यांनी दांड्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा घरात आई, चुलतीसह तीन महिलांच होत्या. मारहाण करणाऱ्या चौघांना आडविण्याचा प्रयत्न केला असता, आईच्या तळहातावर दांड्याचा वार बसला. यात तिची बोटं मोडली आहेत. तर अश्विन यांच्याही डोक्याला जबर मार लागला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चार आरोपीच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबर मारहाण, घरात घुसून मारहाण केल्याचे गुन्हे नोंदविले आहेत. अधिक तपास निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात जग्गनाथ मेनकुदळे करीत आहेत.
घटनेनंतर दलालवाडीत तणावचार आरोपींनी घरात घुसून मुलासह महिलांना मारहाण केल्यामुळे घटना घडलयानंतर दलालवाडीत तणाव निर्माण झाला होता. क्रांतीचौक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त लावला होता. तसेच निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, अमाेल सोनवणे, जग्गनाथ मेनकुदळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, शुभम चावरिया यांच्या तक्रारीवरून अनिरुद्ध जांगडे यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.