- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच नवजात शिशूला सोडून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मानंतर शिशू आईच्या मायेला मुकले असले तरी घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी माता बनून त्या बाळाला मायेची ऊब दिली आहे. ( Mother's escape after delivery; The nurse warmed baby)
घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.१४ वाजता एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हते. दाखल झाल्याच्या अवघ्या काही मिनिटांत म्हणजे सकाळी ९.४० वाजता तिची प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला. महिला आणि तिचे शिशू प्रसूतिगृहातच (लेबर रूम) होते. प्रसूतीनंतर ही महिला दुपारी येथून गायब झाली. हा प्रकार लक्षात येताच सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळून आली नाही. प्रसूतिशास्त्र विभागाने हा प्रकार वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला कळविला. निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण सुखदेवे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे पुढील तपास करीत आहेत. सध्या घाटीतील परिचारिका, केअरटेकर बाळाचा सांभाळ करीत आहेत.
रक्ताची नाती दुरावली ! नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’
बाळ ‘एनआयसीयू’मध्ये दाखललेबर रूममध्ये शिशूला सोडून मातेने पलायन केले. या शिशूला जुन्या ‘एनआयसीयू’त दाखल करण्यात आले आहे. या शिशूची काळजी परिचारिका घेत आहेत. पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत. मातेचा शोध लागला नाही, तर सोशल वर्कर्सच्या माध्यमातून बाळ संबंधित संस्थेला हस्तांतरित केले जाईल.- श्रीनिवास गडप्पा, प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख