औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न आणि मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी आरोपी आईसह तिघा आरोपींना प्रत्येकी २० वर्ष सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ९० हजार रुपये दंड ठोठावला. विनोद रोहिदास पवार (२१), शेख नजीम शेख अजिम (३२, दोघे रा. कन्नड) आणि फिर्यादीची आई (३५) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली होती की, आरोपी शेख नजीम व तिच्या आईमध्ये अनैतिक संबंध होते. फिर्यादीचे वडील कामानिमित्त मुंबईला जात असताना त्यांनी फिर्यादी व तिच्या भावंडांना ओळखीच्या डॉक्टरच्या घरी ठेवले होते. १२ फेब्रुवारी २०१७ रोजी शेख नजीम व फिर्यादीच्या आईने विनोद पवार याच्याशी लग्न लावण्यासाठी फिर्यादीला डॉक्टरच्या घरुन बळजबरी उचलून आणले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिचे लग्न थांबवले. २१ मे २०१७ रोजी फिर्यादीला पुन्हा बळजबरी विनोद पवारच्या घरी नेले. विनोदने फिर्यादीला त्याच्या घरात डांबून ठेवले व तिच्यावर अत्याचार केला. ३ जून २०१७ रोजी घरात कोणी नसताना फिर्यादी पळून डॉक्टरच्या घरी गेली. याबाबत कन्नड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. जे. पवार यांनी तपास केला. सुनावणीवेळी अतिरिक्त लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी विनोद पवार याला भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, पोक्सो कलम ४ व ६ अन्वये प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड, पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि आरोपी शेख नजीम व फिर्यादीच्या आईला पोक्सो कलम १७ अन्वये प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड ठोठावला.