औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील झाल्टा गावात काल रात्री एका २५ वर्षीय विधवा महिलेने प्रथम साडेतीन वर्षीय चिमुकल्याला विहिरीत फेकले अन् स्वत:ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. महिलेने मुलासमवेत आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री उशिरा अग्निशामक विभागाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढले. झाल्टा गावातील रहिवासी अरुणा काशीनाथ अंभोरे (२५) या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती मुलगा श्याम काशीनाथ अंभोरे (साडेतीन वर्षे) आणि वृद्ध सासूसोबत राहत होती. गरिबीमुळे शेतात काम करून मिळालेल्या मजुरीतून ती उपजीविका चालवीत होती. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थितीही खराब झाली होती. काल दिवसभर अरुणाने काम केले. सोमवारच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिमुकल्याला काखेत घेऊन ती घरातून निघाली. गावातील पी.के. शिंदे यांच्या घरासमोरील विहिरीसमोर गेली. विहिरीजवळ कोणी नसल्याचा अंदाज घेऊन तिने श्यामला विहिरीत फेकले. चिमुकला ओरडल्याने आजूबाजूला राहत असलेले नागरिक घराच्या बाहेर आले. तेवढ्यात तिनेही विहिरीतउडी मारली. नागरिक त्वरेने विहिरीकडे धावले. विहिरीला चार परस पाणी असल्याने या दोघा मायलेकांना वाचविणे त्यांना शक्य झाले नाही. पाण्याचा पंप सुरू केला; परंतु पाणी कमी होत नव्हते. अग्निशामक विभागाच्या मदतीने रात्री १ वाजता मायलेकाचे मृृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, पोहेकॉ. शेख शकील करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मुकुंदवाडीत राहणाऱ्या मामाकडे मृतदेह सोपविण्यात आले.
चिमुकल्याला विहिरीत टाकून मातेची आत्महत्या
By admin | Published: July 16, 2014 1:11 AM