जिल्ह्यात ८३ हजार मातांना आतापर्यंत लाभ : ‘मातृवंदना सप्ताह’, लाभार्थींनी नोंदणी करण्याचे आवाहन
योगेश पायघन
औरंगाबाद : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत ‘मातृवंदना सप्ताह’ राबविण्यात येत आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता सर्वांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८३ हजार ८०३ प्रसूत मातांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांच्या बँकेच्या खात्यात ३४ कोटी ९४ लाख ७४ हजार रुपयांचा निधी जमा झाला आहे.
गर्भवती महिला कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात अर्भकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे नोव्हेंबर २०१७ पासून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा अधिकाधिक गर्भवतींनी लाभ घेण्यासाठी मातृवंदना सप्ताहाला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. ७ सप्टेंबरपर्यंत अधिकाधिक लाभार्थ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केले आहे.
------
तीन टप्प्यांत मिळणार पैसे
पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची १०० दिवसांत नोंदणी करताच १ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यांनंतर; परंतु गरोदरपणात एक तपासणी केल्यावर २ हजार रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला १४ आठवड्यांपर्यंत बीसीजी, ओपीव्ही, डीपीओ-पेन्टाव्हॅलेंट आणि कावीळचे लसीकरण झाल्यानंतर २ हजार रुपयांचे अनुदान थेट महिलेच्या बँक किंवा पोस्टाच्या थेट खात्यात जमा होते.
---
पात्रतेचे निकष काय?
पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश होत असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित आहे. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ दिला जातो.
---
लाभासाठी कोठे करायचा संपर्क?
एएनएम (आरोग्य सेविका) पात्र लाभार्थ्यांचा विनाशुल्क विहीत अर्ज नमुना देऊन
परिपूर्ण अर्ज स्वीकारतात. शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्याचाही आर्थिक लाभ दिला जातो. त्यासाठी महिला व पतीचे सहमती पत्र, दोघांची आधारसंबंधी माहिती आणि महिलेचे आधार संलग्न बँक खाते अथवा पोस्ट खाते क्रमांक, कुटुंबातील सदस्याचा मोबाइल क्रमांक अर्जासाठी आवश्यक आहे. तो नसल्यास आरोग्य सेविका कागदपत्र पूर्ततेसाठी मदत करतात.
---
‘मातृ वंदना सप्ताह ७ सप्टेंबरपर्यंत सुरू असून त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी नोंदणी करून घ्यावी. गरोदर मातांचे आधार कार्ड नवीन बँकखाते उघडण्याकरिता शिबिरही आयोजित करण्यात येणार आहे. माता व बालमृत्यू नियंत्रणासह गरोदर माता व अर्भकांची काळजी या माध्यमातून घेतली जात आहे. या सप्ताहानिमित्त घरोघर जाऊन आरोग्याबद्दल जनजागृती केली जात आहे.
-डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, औरंगाबाद