औरंगाबाद : निष्णात मेकॅनिक असलेल्या मोटारसायकल चोराला क्रांती चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या चोरट्याने औरंगाबाद शहरात आणि जालना जिल्ह्यात चोरलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या आरोपीकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
शेख अल्तमश शेख अब्दुल (वय २१, रा. प्रिया कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो बुलेटसह अन्य मोटारसायकलचा निष्णात मेकॅनिक आहे. पोलिसांनी सांगितले की, २ मार्च रोजी गोकुळवाडी येथील विजय राधाकृष्ण पेंढारकर यांची दुचाकी चोरीस गेल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदविली होती. ही चोरी आरोपी अल्तमश आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची गुप्त माहिती खबऱ्याने पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत यांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राऊत, कर्मचारी नसीम पठाण, मनोज चव्हाण, अजीज खान, विलास वाघ, संतोष सूर्यवंशी, अमोल मनोरे आणि देविदास देवकर यांच्या पथकाने अल्तमशला त्याच्या घरातच पकडले.
यावेळी त्याच्याकडे पेंढारकर यांच्या दुचाकीविषयी चौकशी केली असता आरोपीने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शेख समीर शेख सत्तार (रा. प्रिया कॉलनी) याच्यासह दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. शिवाय ही दुचाकी समीरच्या घरी ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी समीरच्या घरातून दुचाकी जप्त केली. समीर मात्र पोलिसांना सापडला नाही. यानंतर अल्तमशला ठाण्यात नेऊन खाक्या दाखविल्यावर त्याने जालना येथून मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. शिवाय शहरातील छावणी पोलीस ठाण्यासह अन्य विविध ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोऱ्या केल्याची कबुली देत करीत चोरीच्या एकूण २ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकल पोलिसांच्या हवाली केल्या.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताआरोपी अल्तमशच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला अटक केल्यावर आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक दराडे यांनी व्यक्त केली.