रांजणगावात महावितरणने थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांची वीजजोडणी कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गरीब कामगार ग्राहकांची वीजजोडणी कापली जात असल्यामुळे ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या वतीने लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र बिले माफ न करता ग्राहकांकडून व्याजासह बिलाची सक्तीने वसुली केली जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्यात यावी, गरीब कामगार ग्राहक व छोट्या व्यावसायिकांची वीजजोडणी कापण्यात येऊ नये, या मागणीसाठी शुक्रवारी ग्राहकांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्राहकांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात प्रदीप बडे, मिलिंद गवई, नितीन शेजुळे, रवि दिवे, रतन खरात, समीर शेख, राजू सदावर्ते, संतोष चोले, संतोष चाबूकस्वार, प्रशांत बन्सोडे, अक्षय वाघमारे, राजू वगर, पोपट म्हस्के आदींनी सहभाग नोंदविला होता.
फोटो ओळ
रांजणगाव शेणपुंजी येथे महावितरणच्या विरोधात वीजग्राहकांनी घोषणाबाजी करीत कनेक्शन कापण्याची कारवाई थांबविण्याची मागणी केली.
---------------------