औरंगाबाद : एन-४, एन-५ सिडको भागात सहा दिवसांनंतरही पाणी न आल्याने भाजप नगरसेवकांसह नागरिकांनी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. लोकप्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. उपअभियंता के.एम. फालक यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर लोकप्रतिनिधींनी आंदोलन मागे घेतले.मागील तीन महिन्यांपासून सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये नगरसेवकांनी पाण्यासाठी अजिबात आंदोलन केले नाही. गुरुवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच नगरसेवकांनी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावर आंदोलनाचे शस्त्र उपसले. सिडको- हडकोतील काही भागांत पाच- सात दिवसांनंतर पाणी मिळते, तर काही भागांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा होतो, ही वस्तुस्थिती आहे. शहराला समान पाणी मिळावे, अशी या भागातील नगरसेवकांची मागणी आहे. एन-४ भागात शनिवारी नवव्या दिवशी, तर एन-५ भागात सहाव्या दिवशी पाणी न आल्याने भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत व शिवाजी दांडगे यांनी एन-५ पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन आंदोलन सुरू केले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के.एम. फालक, अशोक पद्मे यांनीही धाव घेतली. आम्हाला तीन दिवसांआड पाणी का मिळत नाही? असा जाब विचारत एका नागरिकाने फालक यांच्या पाठीत बुक्का मारला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत परिसर सोडणार नाही, असा पवित्रा घेत अदवंत पाण्याच्या टँकरखाली बसल्या. आ. अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दुपारी आयुक्त पाण्याच्या टाकीवर हजर झाले. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पोलीस ठाण्यात तक्रारएन-५ सिडको येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलनादरम्यान दोघांनी महापालिका अधिकाºयांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी उपअभियंता के.एम. फालक यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एन-४ सिडको भागामध्ये शुक्रवारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी देऊ शकलो नाही. पाईपलाईनची दुरुस्ती सायंकाळपर्यंत सुरू होती. शनिवारी पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र, पाण्याच्या टाकीची लेव्हल नसल्यामुळे सकाळी पाणी देता आले नाही. दरम्यान, नगरसेविका माधुरी अदवंत व काही नागरिक पाण्याच्या टाकीवर आले. त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करीत असताना बी.जी. जगताप याने पाठीत चापट मारली, तर ए.ए. चव्हाण याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्यासाठी भाजप नगरसेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:23 PM
एन-४, एन-५ सिडको भागात सहा दिवसांनंतरही पाणी न आल्याने भाजप नगरसेवकांसह नागरिकांनी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. लोकप्रतिनिधी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना धक्काबुक्की : आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे