लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: उस्मानशाही मिल परिसरात गिरणी कामगार, कर्मचारी, मजुरांच्या मुलांसाठी १९५१ मध्ये उघडण्यात आलेल्या शाळेच्या इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे करत मिल प्रशासनाने ही शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे़ परंतु ही शाळा बंद झाल्यास ३७६ विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शाळेतील १८ कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार राहणार आहे़ उस्मानशाही मिल १९२८ मध्ये सुरु करण्यात आली़ त्यावेळी येथील गिरणी कामगार व कर्मचारी मराठी, तेलगू व उर्दू भाषिक होते़ या मुलांच्या शिक्षणासाठी याच परिसरात प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली़ १९५१ मध्ये या शाळेची जिल्हा परिषदेत नोंदही घेण्यात आली़ त्यानंतर शाळेला शंभर टक्के अनुदानही मिळाले़ आजघडीला या शाळेत मराठी माध्यमाचे १ ते ७, तेलगू माध्यमाचे १ ते ४ व उर्दू माध्यमाचे १ ते ७ असे वर्ग चालतात़ त्यात ३७६ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी १८ कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत़परंतु सदरील शाळेची इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत एनटीसीच्या व्यवस्थापकांनी शाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे़ ही शाळा बंद झाल्यास ३७६ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होणार असून १८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे़ शाळेत येणारे सर्व विद्यार्थी ही गोरगरीब कुटुंबातून आलेले आहेत़ याबाबत कर्मचारी आणि पालकांनी मंगळवारी आ़हेमंत पाटील यांची भेट घेतली़ त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले़ त्यावर आ़ पाटील यांनी ही शाळा बंद होऊ देणार नसून त्याबाबत वस्त्रोद्योगमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले़
मिल प्रशासनाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली
By admin | Published: June 28, 2017 12:27 AM