लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने जिन्सीतील सुमारे साडेचार एकर जागा २१ कोटी ७५ लाख रुपयांमध्ये चार भागीदारांना विकण्याची तयारी सुरू केली असून, त्यांना तातडीने त्या जमिनीचा ताबा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे.सदरील जागेप्रकरणी निविदा काढून कार्यवाही करावी, मात्र जमिनीचा ताबा देण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकाकर्त्याची याचिकेची माहिती जमीन खरेदी करणा-यांना देणे गरजेचे आहे. बाजार समितीने याप्रकरणी लपवाछपवीचा खेळ सुरू करून राजकीय खिरापतीप्रमाणे त्या जागेच्या व्यवहारात मलिदा लाटण्यासाठी तेथील जुना बंगला पाडून टाकला आहे.मागील दोन दिवसांपासून जिन्सीसमोरील साडेचार एकर जागेचे सपाटीकरण कंगाल असलेल्या बाजार समितीने तातडीने सुरू केले आहे. शिवाय तेथील एक जुना बंगलादेखील बाजार समितीने अतिक्रमण म्हणून पाडला आहे. या सगळ्या संशयास्पद घटना घडत असताना जिन्सी पोलिसांकडे संबंधित याचिकाकर्त्याने केलेल्या तक्रारींकडेदेखील दुर्लक्ष केले आहे.आॅगस्ट १९८६ मध्ये कृ उबाने ती जमीन विक्रीसाठी निविदा मागविल्या. ३५ लाख रुपयांची ती निविदा होती. ६ लाख ७५ हजार रुपये त्यासाठी एका निविदाधारकाने भरले. परंतु त्यावेळी कृ उबाने जमिनीचा ताबा दिला नाही. परिणामी प्रकरण कोर्टात गेले. ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात बाजार समिती प्रशासन आणि सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
कोट्यवधींच्या जागेचा ताबा देण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:10 AM