पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात जलसमाधी घेण्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाने सकाळ पासून डाव्या कालव्यावर तगडा बंदोबस्त ठेवत जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना काठावर अडवून स्थानबद्ध केले यामुळे मोठा अनर्थ टळला. आक्रमक शेतकरी व पोलीस प्रशासनात या दरम्यान बऱ्याच वेळा शाब्दिक चकमकी उडाल्या. आंदोलन दरम्यान पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आंदोलनाची तीव्रता कमी झाली.
तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातुन पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्या जवळ जलसमाधी आंदोलन केले. पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासह संपूर्ण गोदावरी चे पात्र कोरडे पडल्याने जवळपास ४० गावात पाणीबाणी निर्माण झाली होती. शेतातील पिकांचे भवितव्य धोक्यात आले होते. त्यातच जायकवाडीतून दोन्ही कालव्या द्वारे पाणी सोडण्यात आल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली होती.
डावा कालवा परिसरात जमलेल्या शेतकऱ्यांनी जयाजी सुर्यवंशी, माऊली मुळे व किशोर दसपुते यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत डाव्या कालव्याकडे आगेकूच केली. शेतकरी कालव्यात उडी मारण्या अगोदरच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, फौजदार राहुल पाटील आदींनी अडवले. या वेळी तहसीलदार महेश सावंत, जायकवाडीचे उप कार्यकारी अभियंता खेडकर, जगताप, संदिप राठोड यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत पाणी सोडण्याचे आदेश झाले असल्याचे सांगितले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या आंदोलनात हनुमान बेळगे, एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ, लक्ष्मण लांडगे, मकबुल पठाण, नंदकिशोर गोर्डे, बाळासाहेब जाधव, मुस्ताक पठाण, सलीम पठाण, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
उद्या सोडणार पाणी
जायकवाडी धरणातून उद्या दि ८ रोजी जलविद्युत प्रकल्पाच्या मोरीतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी जाहीर केले, तहसीलदार महेश सावंत यांनी पत्र आंदोलकांना दिले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांची भाजपा युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, लक्ष्मण औटे, डॉ सुनील शिंदे, कल्याण गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, अनंत औटे, आबा मोरे, सुरेश दुबाले, प्रल्हाद औटे, कांतराव औटे आदींनी भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.या नुसार खा. दानवे यांनी पाणी सोडण्याचे पत्र दि ४ रोजी जलसंपदा मंत्र्यांना दिले होते आज या बाबत दानवे यांनी शासनाकडून आदेश पारीत करून घेतले असे आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. दरम्यान पाणी सोडण्यात यावे या साठी आमदार संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, जयाजी सुर्यवंशी, रामप्रसाद खराद, जिल्हाधिकारी जालना, औरंगाबाद व विभागीय आयुक्त यांनीही पत्र दिले होते.