- विकास राऊत
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते अजिंठा ते जळगाव या रस्त्याच्या कंत्राटदाराला राज्य महामार्ग प्राधिकरणाने दिलेले ६० कोटी रुपये बँकेने वळती करून घेतल्यामुळे कंत्राटदाराला त्या कामासाठी पैसे कुठून उभे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कमी भावाने काम देऊन फसगत झाल्याची भावना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी भावाने काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम न देण्याबाबत शासनाने मध्यंतरी एक अध्यादेश काढला होता; परंतु तो अध्यादेश या कामासमोर फिका पडला आहे. परिणामी चिखल, खड्डेमय झालेला तो रस्ता सध्या अपघात मार्ग म्हणून पुढे आला आहे.
आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीला त्या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. १ हजार कोटींच्या आसपास त्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन सव्वा ते दीड वर्षाचा काळ लोटला आहे. यातील ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी बँक गॅरंटी मिळावी, यासाठी कंत्राटदार प्रयत्न करीत होता. महामार्ग प्राधिकरणानेदेखील ६० कोटी रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला दिला. कंत्राटदाराने धनादेश बँकेत टाकला आणि बँकेने ती रक्कम इतर देण्यांच्या तडजोडीत वळती करून घेतली.
कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाची यामुळे कोंडी झाली आहे. असे सूत्रांनी सांगितले. आम्ही ६० कोटींचे बिल दिले होते, बँकेत जमा करताच ते बँकेने काढून घेतले. कंत्राटदारावर किती कर्ज आहे हे माहिती नाही. भटनागर म्हणून कंत्राटदाराकडे हे काम देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने काढणे म्हणजे त्या कामाला प्रचंड उशीर लागेल. त्यामुळे थर्ड पार्टीकडून काम करण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.