औरंगाबाद : देशी आणि परदेशी कंपन्यांबरोबर सरकारने सामंजस्य करार केले आहेत. दोन महिन्यांच्या अवधीत काही उद्योग सुरू होतील. फूड प्रोसेसमध्ये चांगले काम करणाऱ्या कंपन्या येथे येतील. एका मोठ्या फूड प्रोसेस उद्योगाशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑरिकसिटी मोठी उद्योगनगरी होणार असून, तेथे गुंतवणुकीसाठी एका मोठ्या रशियन कंपनीशी बोलणी सुरू आहे. इलेक्ट्रीकल्स ट्रान्सफार्मरसाठी लागणाऱ्या पत्र्याचे उत्पादन करण्याचा करार त्या कंपनीशी होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
पालकमंत्री देसाई म्हणाले, गेल्या महिन्यात नगरविकास खात्यासोबत एक बैठक झाली. त्यात गुंठेवारी, लीजहोल्डचे फ्रीहोल्ड करण्याचा विषय चर्चेला आला होता. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाणीपुरवठा योजनेबाबत ६०० कोटींचे हमीपत्र मनपाकडून शासनाने घेतले आहे, असे विचारता देसाई म्हणाले, मनपाचा वाटा योजनेमध्ये असतो. त्यामुळे ते पत्र नियमाला धरून घेतलेले आहे.