विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा प्रशासकीय विभागाचे आयुक्त डॉ. पुुरुषोत्तम भापकर यांना शासनाचा शिक्षणशास्त्र वाङ्मय पुरस्कार ज्या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. त्या ‘हे शक्य आहे’ पुस्तकावर लवकरच चित्रपट निर्मिती होणार आहे. त्या चित्रपटाचे नावही ‘हे शक्य आहे’ हेच राहणार आहे. तसेच डॉ. भापकर यांनी लिहिलेली गीतं ‘पाणीबाणी’ या चित्रपटात वाजणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची लवकरच निर्मिती होणार असून, डॉ. भापकरांच्या साहित्यविश्वाशी निगडित असलेली काही मंडळी त्यांनी मनपा आयुक्त असताना केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरही चित्रफीत अथवा चित्रपट निर्मिती करण्याबाबत विचार करीत आहेत.जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, शिक्षण आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन आयुक्त, रोजगार हमी योजना सचिव आणि मराठवाडा प्रशासकीय विभागाचे प्रमुख अशा पदांवर काम करताना आलेल्या अनेक अनुभवांची शिदोरी डॉ. भापकर यांच्याकडे आहे. स्वच्छेतचा वारकरी या पुस्तकातून त्यांनी स्वच्छतेबाबत प्रसार केला. शिक्षण आयुक्त असताना मराठवाडा, विदर्भ विशेषकरून गडचिरोली, भामरागड परिसरात जे काम केले, त्या कामाच्या अनुभवानंतर प्रशासकीय कामकाजाच्या धावपळीतून वेळ काढीत ‘हे शक्य आहे’ या पुस्तकाचे लिखाण केले. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक बारकावे या पुस्तकात टिपले आहेत, त्यावर चित्रपट निर्मिती झाल्यानंतर शिक्षण प्रसारासाठी मदत होणे अपेक्षित आहे.२००९ ते २०१३ पर्यंत मनपा आयुक्तपदी काम करीत असताना त्यांनी वर्षभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील रस्ते रुंद करण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय राहिला. त्या कामकाजावर एक चित्रपट निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली असून, ती सध्या कागदावरच आहे. आगामी काळात ‘पुरुषोत्तम’ या नावाने तो चित्रपट येण्याची शक्यता आहे.खर्च कोण करणार?चित्रपट निर्मितीसाठी होणारा खर्च संबंधित गु्रप करणार आहे. याबाबत डॉ. भापकर यांना विचारले असता ते म्हणाले, चित्रपटाची मी निर्मिती करणार नाही. त्यामुळे खर्चाचा संबंध येत नाही. काही मंडळी त्यावर काम करीत आहेत. ‘हे शक्य आहे’ या पुस्तकावरील चित्रपटासाठी काम सुरू असून, पटकथेवर काहीजण काम करीत आहेत.पाणीबाणी या चित्रपटात मी लिहिलेली गीते संगीतबद्ध होणार आहेत. मनपातील कामगिरीबाबत निर्मितीची संकल्पना आहे. मात्र, त्यावर अद्याप फक्त एक गु्रप चर्चा करतो आहे. त्याबाबत आताच काही सांगणे जमणार नाही.
‘हे शक्य आहे’ या पुस्तकावर निघणार चित्रपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:43 AM