औरंगाबाद : सर्वाधिक वर्दळीच्या बाबा पेट्रोलपंप चौकात शनिवारी सायंकाळी अचानक धावत्या कारने पेट घेतला. यावेळी सुदैवाने कारचालकासह आतील प्रवाशांना तातडीने कारमधून बाहेर काढण्यात आल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.अधिक माहिती अशी की, इंडिका कार क्रमांक एमएच-१४ एक्स-६६२० ही रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रांतीचौकाकडून नगरनाक्याकडे जात होती. वाहतूक सिग्नलवर अन्य गाड्यांसोबत ही कारही थांबली होती. त्यावेळी ग्रीन सिग्नल लागताच कारचालकाने गाडी सुरू केली आणि कारचा अॅक्सिलेटर वाढविले. त्याच वेळी कारच्या इंजिनमधून धूर निघू लागला. वाहतूक नियंत्रण करीत उभे असलेले सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल यांचे त्या कारकडे लक्ष गेले. त्यांनी वाहतूक पोलीस संघपाल दाभाडे, एस. बी. काळे यांना ती कार थांबविण्यास सांगितले. पोलिसांनी कारचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस मुद्दामहून आपल्याला अडवीत असल्याचे त्याला वाटले. मात्र, कारच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी कारचालकासह अन्य प्रवाशांना कारमधून उतरविले. तसेच अन्य वाहनांना कारपासून दूर केले. यावेळी वाहतूक पोलिसांनी बाटल्यांनी पाणी ओतून कारला लागलेली आग विझविली. या घटनेत कारचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाल्याचे चालकाचे म्हणणे होते. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली.काच फोडलीगारखेडा परिसरातील अशोकनगर येथे अनोळखी व्यक्तीने आठवडाभरात तीन कारच्या काचा फोडल्याची घटना ताजी असतानाच हडको एन-११, यादवनगर येथे कारची मागील काच दगड मारून फोडली. हा प्रकार २८ जून रोजी मध्यरात्री घडला.यादवनगर येथील रहिवासी मोहम्मद खलील उर रहेमान यांच्या मालकीची ही कार (क्रमांक एमएच-२० सीएस १२५०) घराच्या बाजूला उभी होती. कारचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली.
धावत्या कारला लागली आग
By admin | Published: June 29, 2014 12:44 AM