औरंगाबाद: रस्त्यावरील खड्ड्याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी रेल्वेस्टेशन चौक आणि पुलावर आंदोलन करणाऱ्या खासदार इम्तियाज जलीलसह ६० ते ७० कार्यकर्त्याविरुध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शहरात आंदोलनाला परवानगी नाही . शिवाय जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना एमआयएमच्या वतीने खा. जलील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले नाही. शिवाय अनेक कार्यकर्त्यांनी मास्क अर्धवट घातले होते.
या आंदोलनकर्त्याविरूध्द पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली. यात खा. जलीलसह अब्दुल समीर साजेद बिल्डर,अरुण बोर्डे ,मुन्शी पटेल, नासेर सिद्दिकी ,रफिक चित्ता ,आरेफ हुसेन, सांडू इसाक हाजी, गंगाधर ढगे, गजानन उगले पाटील, जमीर अहमद कादरी, अनिस शेख, मुदासिर अन्सारी यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्तांवर गुन्हा नोंदविण्यात आला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करण्याचा हा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरिक्षक शंकर डुकरे तपास करीत आहेत.